Pune News: शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा मृत्यू, दौंडमधील घटनेने हळहळ

Pune News: राजाराम बापूराव खळदकर आणि पत्नी मनीषा राजाराम खळदकर अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

देविदास राखुंडे, बारामती

Pune News: शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या नवरा-बायकोचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील दौंड तालुक्यातील नांदगावात समोर आली आहे. शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या महिलेला शॉक बसला, तिला वाचवण्यासाठी गेलेल्या पतीलाही शॉक लागून तिघांचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजाराम बापूराव खळदकर आणि पत्नी मनीषा राजाराम खळदकर अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव येथे भीमा नदीच्या काठावर मनीषा खळदकर व राजाराम खळदकर हे शेळीला चारा-पाणी देण्यासाठी गेले होते. शेळी चरत असलेल्या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटारीच्या पॅनल बॉक्सला करंट आल्याने त्या बॉक्सला शेळी चिकटली. शेळीला विजेचा जोराचा धक्का लागला व ती शेळी त्या पॅनल बॉक्सला चिकटली.

(नक्की वाचा- Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)

शेळीला विजेचा धक्का लागल्याचे पाहताच मनीषा खळदकर या शेळीला वाचवण्यासाठी गेल्या असता त्यांनाही विजेचा धक्का बसला. ही घटना तिथे असलेल्या मनीषा यांचे पती राजाराम यांनी पाहिली अन् पत्नीला वाचवण्यासाठी राजाराम खळदकर हे देखील तिथे गेले. मात्र त्यांनाही विजेचा तीव्र धक्का बसला.

दुर्दैवाने या अपघातात शेळीसह पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मृत मनीषा व राजाराम खळदकर यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघेही शालेय शिक्षण घेत आहेत.

Advertisement

Topics mentioned in this article