देवा राखुंडे
सध्या नऊरात्र सुरू आहे. संपूर्ण राज्यात भक्तीमय वातावरण आहे. देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातील लोक वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे. कोणी सप्तश्रृंगी गडावर तर कुणी कार्ल्याच्या एकविका देवीचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत. कुणी शिर्डीवारी ही करत आहेत. या काळात भक्त देवाच्या चरणी मोठ मोठी दान ही करत आहेत. शिर्डीत साई चरणी चढवलेल्या दानाची चर्चा ही नेहमीच होत असते. पण आता चर्चा आहे ती जेजूरीच्या खंडेरायाची. इथं ही एका भक्ताने केलेल्या दानाची जोरदार चर्चा आहे.
काही भक्त नवरात्रात जेजूरीच्या खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. विकास तुकाराम कदम हे ही खंडेरायाचे भक्त आहेत. ते मुळचे पनवेलचे रहिवाशी आहेत. त्यांनी अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी मार्तंडाच्या चरणी नवरात्र उत्सवात मोठे दान अर्पण केले आहे. त्यांनी आठ किलो वजनाचे त्रिशूळ खंडेरायाच्या चरणी अर्पण केले आहे.त्याची किंमत तब्बल बारा लाख रुपये आहे. खंडेराया प्रती असलेली श्रद्धा यामुळे आपण हे दान केल्याचं ही त्यांनी या निमित्ताने सांगितले आहे.
विशेष म्हणजे मागील दोन दिवसांपूर्वी ही असेच एक त्रिशूळ खंडेरायाच्या चरणी अर्पण करण्यात आले होते. थेऊर गावचे सुजित काळे या भक्ताने हे दान केले होते. त्यांनी अकरा किलोचे त्रिशुळ दान केले. त्याची किंमत सोळा लाख रुपये होती. म्हणजेच या दोन भक्तांनी दोन त्रिशुळ खंडेरायाच्या चरणी अर्पण केली आहे. जवळपास 28 लाख किंमतीचे हे दोन्ही त्रिशुळ आहेत. अनेक भक्त हे खंडेरायाला त्रिशुळच अर्पण करत असतात.
सध्या नवरात्रात भक्तांनी जेजूरी गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. त्यात या दानाची चर्चाही होताना पाहायला मिळत आहे. अनेक भाविक खंडेरायाला सोन्याचांदीचे दागिने अर्पण करीत असतात.मार्तंड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनी खंडेरायाचे भक्त विकास कदम यांचा 8 किलोचा चांदीचा त्रिशूळ अर्पण केल्याने सन्मान केला. दरम्यान या खंडेराया चरणी अर्पण केलेले दोन्हीही त्रिशूळ पाहण्यासाठी भाविक गर्दी करीत आहेत.