राहुल कुलकर्णी, पुणे
पुण्यातील प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर नागरिकांमध्ये असंतोष आहे. उपचारात दाखवलेली असंवेदनशीलता आणि त्यानंतर जुळ्या मुलींना जन्म देणाऱ्या मातेच्या मृत्यूनंतर या हॉस्पिटलच्या विरोधात कारवाईची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणात हॉस्पिटलची चौकशी करण्याची घोषणा दिली आहे.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचे ट्रस्टी आणि मेडिकल डायरेक्टर डॉ. धनंजय केळकर यांनी सर्व आरोप पत्राद्वारे पुन्हा फेटाळले आहेत. घडलेला प्रकार आणि रुग्णालयाचा काहीही संबंध नसल्याचं केळकर यांनी म्हटलं आहे. दीनानाथ रुग्णालय इमर्जन्सीमधील कोणत्याही पेशंटकडून जसं इमर्जन्सी रूम, डिलिव्हरी विभाग, लहान मुलांचा विभाग अनामत रक्कम घेतली जाणार नाही, हे देखील स्पष्ट केलं.
दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या नावाला काळे फासल्यामुळे आमची मान शरमेने खाली गेली. सगळं पाहून लता मंगेशकर यांना मानणाऱ्यांच्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देव जाणे, असे डॉ. केळकर यांनी पत्रात म्हटलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धनंजय केळकर यांनी पत्रात काय म्हटलंय?
कालचा दिवस दीनानाथच्या इतिहासातील अत्यंत काळा व सुन्न करणारा होता. आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता, रागावलेल्या मोर्चातील एका समूहाने पब्लिक रिलेशन ऑफिसर्सच्या अंगावर चिल्लर फेकली, महिला कार्यकर्त्यांनी जाऊन डॉक्टर घैसास यांच्या आई वडिलांच्या हॉस्पिटलवर हल्ला केला व तोडफोड केली. एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर या नावाला काळे फासले व या सर्व गोष्टी जबाबदारपणे टेलिव्हिजन कॅमेऱ्यासमोरच घडल्या. हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली व लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देवच जाणे.
हेचि काय फळ मम तपाला, इथपासून ते या समाजात चांगले काम करूच नये अशा प्रकारचे सर्व विचार व सल्ले मिळू लागले. या सर्व गोष्टींनी उद्विग्न होऊन विश्वस्त मंडळाची काल छोटी बैठक झाली व त्यात या विषयावर सखोल चर्चा झाली. लोकं कशा पद्धतीने चुकीचे वागत आहेत किंवा या विषयाला राजकीय रंग कसा येत चालला आहे हे सोडून देऊन, आपले काय चुकत आहे यावर आत्मचिंतन करण्यात आले.
(नक्की वाचा : Pune News: 'एक कोटींची जमीन 1 रुपये भाडे...', तरीही मंगेशकर हॉस्पिटलची पैशासाठी मग्रुरी का? )
महिलेच्या मृत्यूचा दीनानाथ रुग्णालयाशी संबंध जोडणे चुकीचे
महिलेच्या मृत्यूच्या घटनेमागे मागे दीनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणे जरी चुकीचे चालले असले तरी रुग्णालयाकडून रुग्णाप्रति संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे आम्ही तपासत आहोत. सदर महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः त्यांना तुम्हाला जमेल तेवढी रक्कम भरा बाकी आम्ही सर्व मदत करू, असे सांगितलेले असतानाही कोणालाही न कळवता ते निघून गेले.
(नक्की वाचा- Shirdi News : फाड-फाड इंग्रजी, डोळ्यात पाणी; शिर्डीत भीक मागताना सापडला ISRO चा अधिकारी)
अनामत रक्कम घेतली जाणार नाही
जेव्हा दीनानाथ सुरू झाले तेव्हा कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम (डिपॉझिट) घेतली जात नसे. परंतु जसे जसे उपचार व शस्त्रक्रिया व रुग्णालयाचे नाव वाढत गेल्यामुळे येणारे गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले. तसे तसे जास्त महागडे उपचार गरजेचे असल्यास अनामत रक्कम घेण्यास कुठेतरी सुरुवात झाली. कालच्या उद्विग्न करणाऱ्या घटनेने आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला व यापुढे दिनानाथ रुग्णालय इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंटकडून मग तो इमर्जन्सी रूममध्ये आलेला असो वा डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलेला असो वा लहान मुलांच्या विभागाला आलेला असो त्यांच्याकडून इमर्जन्सीमध्ये अनामत रक्कम घेणार नाही, असा विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केला व आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. झालेल्या घटनेतील सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईलच परंतु ह्या निमित्ताने या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत याची सर्व बंधू-भगिनींनी व माननीय मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी.