- सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक लढणार
- पुणे सत्र न्यायालयाने निवडणूक लढविण्यासाठी आंदेकर कुटुंबाला कोणताही प्रतिबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे
- बंडू आंदेकर सध्या गंभीर आरोपांत अटकेत असूनही त्याला निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे असे वकिलांनी म्हटले आहे
रेवती हिंगवे
कुख्यात गुंड सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आता आगामी पुणे महानगरपालिका लढवणार आहे. फक्त बंडूच नाही तर त्याच्याच कुटुंबातील माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर हे देखील निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. या बाबत आपल्या वकिलामार्फत त्यांनी पुणे न्यायालयात अर्ज केला होता. पुणे सत्र न्यायालयाकडून त्यांना निवडणूक लढण्यास हिरवा कंदील ही मिळाला आहे. निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. त्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता नाही असे नमूद करत विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने आरोपींना निवडणूक लढविण्यासाठी कोणताही प्रतिबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आंदेकर परिवारातील काहींना निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बंडू आंदेकरने त्याचा वकीलामार्फत निवडणूक लढवण्याची मागणी केली होती. ती मागणी आता न्यायालयाने मंजूर केली आहे. बंडू आंदेकरच्या वकिलांनी हे ही सांगितले की त्या वेळेस बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, आणि सोनाली आंदेकर यांना पोलीस सुरक्षेची पण गरज पडेल. ती ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. तर बंडू आंदेकर गंभीर आरोपात अटकेत आहे. असं असलं तरी तो अजून कन्विक्ट झालेला नाही, म्हणून बंडू आंदेकरला निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे असं बंडूचे वकील मिथून चव्हाण यांनी स्पष्ट केले.
बंडू आंदेकर हा एकीकडे आपली टोळी चालवत होता. तर दुसरीकडे त्याच्या कुटुंबातील अनेक जण आतापर्यंत पुणे महापालिकेची निवडणूक लढले आहेत. काहींना नगरसेवक होण्यात यशही मिळालं होतं. त्यांच्या कुटुंबातील वत्सला आंदेकर ह्या तर पुणे महापालिकेच्या महापौर होत्या. त्यांनी1998-99 काळात महापौरपद भूषवलं आहे. या शिवाय राजश्री आंदेकर या पण नगरसेविका राहील्या आहेत. त्या 2007 आणि 2012 मध्ये नगरसेविका होत्या. त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आल्या होत्या. या शिवाय उदयकांत आंदेकर हा तर जवळपास 15 वर्ष नगरसेवक होता. 1992 पासून तो सतत निवडून येत होता. त्यानंतर वनराज आंदेकर ही नगरसेवक झाला. तोही राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आला होता. तो 2017-22 या काळात नगरसेवक होता. त्याच काळात त्याचा खून ही झाला.
काही महिन्यांपूर्वी कुख्यात गुंड बंडू आंदेकरने आपल्याच नातवाचा खून केला होता. वनराज आंडेकरच्या खूनाचा बदला घेण्यासाठी त्याने हा खून केल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणात त्याला पोलीसांनी अटक केली आहे. तेव्हा पासून आंदेकर कुटुंबातील अनेकांना गजाआड करण्यात आलं आहे. शिवाय त्याचे नंबरकारी पण एक एक करून पोलिसांनी पकडले आहेत. पण आता निवडणुकीच्या निमित्ताने बाहेर येण्याचा प्रयत्न आंदेकरने चालवला आहे. त्यामुळे तो आणि त्याच्या कुटुंबातील काही सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पण ते अपक्ष लढणार की कोणत्या पक्षाची उमेदवारी घेवून मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.