अविनाश पवार
घनश्याम दरोडे हा छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने मराठी बिग बॉसमध्ये ही आपली छाप सोडली होती. त्या माध्यमातून तो घराघरा पोहोचला होता. मात्र तो सध्या एक वेगळ्याच समस्येला सामोरा जात आहेत. सोशल मीडियावर त्याला सातत्याने ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे घनश्याम दरोडे ऊर्फ ‘छोटा पुढारी' प्रचंड तणावात आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट करण्यात आल्या होत्या. त्यामुळे तो संतापला आहे. शिवाय यातून त्याने टोकाचं पाऊल उचलण्याचा इशाराही दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकीकडे त्याला श्रद्धांजली वाहीली जात आहे. तर दुसरीकडे त्याच्या शरीरावर व कुटुंबावर अश्लील टिप्पणी, तसेच पर्सनल मीम्स तयार करण्यात आल्याचा आरोप दरोडे यांनी केला आहे. या ट्रोलिंगमुळे मानसिक ताणासोबतच त्याला आर्थिक नुकसानही सहन करावे लागत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. घनश्याम दरोडे हे सोशल मीडियावर ‘छोटा पुढारी' या नावाने ओळखले जातात. राजकीय, सामाजिक विषयांवर स्पष्टपणे मत मांडणे, तसेच कोल्हापूर-पुणे परिसरातील स्थानिक प्रश्नांवर थेट भाष्य करणे, यामुळे त्यांचा स्वतःचा वेगळे चाहतावर्ग तयार झाला आहे.
ट्रेंडिंग बातमी - MNS News: 'मराठीचा आदर केला नाही तर फटके पडणारच', मीरारोडचा वाद चिघळणार?
मात्र याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर त्यांच्यावर ट्रोलिंगचे प्रमाण वाढले आहे. या सर्व प्रकारांना कंटाळून दरोडे यांनी पोलिसांना आत्मदहनाचा इशारा दिला होता. “मी कोणालाही धमकी देत नाही, पण पोलिसांनी कारवाई न केल्यास आत्मदहन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे स्पष्ट पणे त्याने सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घनश्याम दरोडे यांना भेटीसाठी बोलावून चर्चा केली होती. या चर्चेत उदय सामंत यांनी, “या प्रकरणातून नक्कीच मार्ग काढू,” असे आश्वासन दिले होते.
ट्रेंडिंग बातमी - ड्रग्ज प्रकरणात सापडल्यास थेट मकोका लागणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
मात्र, “माझी बदनामी करणाऱ्यांना पोलिसांनी हजर केले नाही, तर मी मागे हटणार नाही,” अशी आक्रमक भूमिका घनश्याम दरोडे यांनी घेतली आहे. घनश्याम दरोडे यांनी सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल करण्याची तयारी दाखवली आहे. पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्यास आत्मदहनाचा इशारा कायम ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सोशल मीडिया अकाउंटवरून केलेल्या अश्लील पोस्ट, मीम्स आणि बदनामी करणाऱ्या कंटेंटवर त्वरित पावले उचलण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. हा विषय सध्या पुणे व सोशल मीडिया क्षेत्रात चर्चेचा बनला आहे. सायबर बदनामी विरोधातील कायदा कसा प्रभावीपणे अंमलात आणता येईल यावरून पुन्हा प्रश्न निर्माण झाले आहेत.