- जुन्नर तालुक्यातील आळे गावात 75 वर्षीय लक्ष्मीबाई अल्हाट 73 दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे
- या उपोषणामागील मागणी म्हणजे त्यांच्या नातवाच्या खुन्यांना शिक्षा देणे आणि दोषींवर कठोर कारवाई होणे आहे
- उपोषणादरम्यान पोलिसांनी खुनाचा सखोल तपास न केल्याचा आरोप केला जात आहे
अविनाश पवार
एक 75 वर्षांची आजी गेल्या 73 दिवसांपासून उपोषणाला बसली आहे. पण तिला कुणी दाद देण्यास तयार नाही. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळे येथे या आजीचे उपोषण सुरू आहे. आपल्या नातवाच्या हत्येप्रकरणी न्याय मिळावा आणि दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी 75 वर्षीय लक्ष्मीबाई लक्ष्मण अल्हाट आणि त्यांचे पुत्र राजेंद्र अल्हाट गेल्या 73 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मात्र, अडीच महिने उलटूनही एकाही जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्याने या आंदोलनकर्त्यांची साधी विचारपूसही केली नाही. असा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या आंदोलनाची आता जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.
साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे. स्मारकाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अविनाश ललित आल्हाट यांचा खून झाला होता. या खुनाचा तपास पोलिसांनी सखोल करावा आणि रात्रीतून हटवलेला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा कोणी गायब केला, याची चौकशी व्हावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या कधी ऊन तर कधी अवकाळी पाऊस पडत आहे. अशा जीवघेण्या हवामानातही हे कुटुंब उघड्यावर बसून आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कडाक्याचे ऊन आणि सोबतीला अवकाळी पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीतही ही वृद्ध माता आळे गावाजवळील माळरानावर आपल्या निर्णयावर ठाम आहे. 73 दिवस उलटूनही शासन दरबारी या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने स्थानिक स्तरावर संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे सरकार 'लाडकी बहीण' आणि 'ज्येष्ठ नागरिक' योजनांच्या जाहिराती करत असताना, दुसरीकडे पुण्याच्या जुन्नरमध्ये या आजीला आपल्या नातवाच्या खुन्यांना शिक्षा व्हावी म्हणून 73 दिवस माळरानावर उपोषण करावं लागतआहे.
लक्ष्मीबाई अल्हाट असं या माऊलीचं नाव असून, गेल्या अडीच महिन्यांपासून त्या आळे येथे न्यायाची वाट पाहत आहेत. धक्कादायक म्हणजे, अद्याप एकही अधिकारी या आंदोलनाकडे फिरकलेला नाही. राजेंद्र अल्हाट आणि त्यांच्या आईचे म्हणणे आहे की, स्मारकाच्या आंदोलनानंतर अविनाश आल्हाट यांचा खून झाला, पण पोलिसांकडून ठोस कारवाई होत नाही. त्यातच वस्तीतील अण्णा भाऊ साठे यांचा पुतळाही रात्रीतून गायब करण्यात आला. "माझा नातू गेला, आता न्याय मिळाल्याशिवाय मी इथून हलणार नाही," असा टाहो ही आजी फोडत आहे.