यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News : पुण्यातील शहरी भागात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा समोर आल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शहरात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट एका निवासी भागात घुसखोरी करत पाळीव प्राण्यावर हल्ला केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये चांगलीच घबराट पसरली असून, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नेमकं काय घडलं?
विमाननगर-लोहगाव परिसरातील हरणतळे वस्ती येथे रविवारी मध्यरात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एका बंगल्याच्या आवारात बिबट्याने शांतपणे प्रवेश केला. आवारात बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर त्याने अचानक झडप घातली आणि कुत्र्याला तोंडात धरून बिबट्या क्षणात पसार झाला. ही संपूर्ण थरारक घटना बंगल्याच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे.
( नक्की वाचा : Mosquito Spray: घरातल्या फक्त 3 गोष्टी अन् डासांचा खेळ खल्लास; केमिकलशिवाय डास पळवण्याचे सोपे घरगुती उपाय )
घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. परिसरात बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी पथके तैनात करण्यात आली असून, शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. रहिवासी भाग असल्याने नागरिकांनी अत्यंत दक्षता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे आणि परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्यास तातडीनं वन विभाग किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा, अशा स्पष्ट सूचना वन विभागाने दिल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world