- पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही दिवसांपासून बिबट्याचे हल्ले वाढले आहेत.
- बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये काही जणांचा जीव गमावल्याने स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- पुणे शहराच्या पाषाण परिसरात रविवारी रात्री बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये धडकी भरली आहे.
रेवती हिंगवे
गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. ही बिबटे मानवीवस्तीत घुसत आहेत. पहिले ते शेतापर्यंत मर्यादीत होते. पण आता ते थेट मानवीवस्तीत घुसत आहेत. नुसते मानवीवस्तीत नाही तर त्यांचे आता लोकांवर हल्लेही वाढले आहेत. त्यात काही जणांना आपला जीव ही गमवावा लागला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने काही पावलं ही उचलली आहेत. पण तरी ही त्यांना हवा तसा पायबंद करता आला नाही. त्यात कमी की काय आता ग्रामीण भागातून थेट शहराच्या दिशेने या बिबट्यांनी कुच केल्याचं दिसतं. एक बिबट्या सध्या पुणे शहरात आढळून आला आहे. त्यामुळे सर्वच जण हादरून गेले आहेत.
पुणे शहर हे गजबजलेलं शहर आहे. कुठेही गेलात तरी तुम्हाला रहदारी आणि गजबज दिसून येते. मात्र पुणेकरांना धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुणे शहरात एका बिबट्याने शिरकाव केला आहे. हा बिबट्या पुण्याच्या पाषाण परिसरात वावरताना दिसून आला आहे. रविवारी रात्री 12.30 वाजता हा बिबट्या दिसून आला आहे. पाषाम परिसरातील हॉटेल डी पॅलेस ते लेनटना गार्डन एन.डी.ए. पाषाण मेन रोड परिसरात या बिबट्याला पाहण्यात आला आहे.
पाषाण परिसरात मुक्त पणे रात्रीच्या वेळी वावरतना या बिबट्याला पाहीलं गेलं आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी अनावश्यकपणे रात्री उशिरा बाहेर पडणे टाळावे असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. लहान मुले व पाळीव प्राण्यांना घराबाहेर एकटे सोडू नये अशी सुचना ही करण्यात आली आहे. शिवाय जर काही कारणाने बाहेर पडलाच तर सतर्क राहावे असं ही सांगण्यात आलं आहे. शिवाय तुम्हाला बिबट्या आढळल्यास त्वरीत वनविभाग किंवा पोलीस प्रशासनास माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
आपली सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. सावध रहा, सुरक्षित राहा असं ही वन विभागाकडून सांगण्यात आलं आहे. पण शहराच्या वेळीवरच बिबट्या आल्याने नागरिकांना धडकी भरली आहे. त्याला कारण गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना आहेत. बिबट्याने थेट लोकांनाच लक्ष केले आहे. अशा स्थितीत जर हा बिबट्या मोठ्या वरदळीच्या ठिकाणी आला असेल तर सर्वांचीच धांदल उडणार आहे. असं असलं तरी वन विभाग या परिसरात आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना आखत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही असं ही सांगण्यात आलं आहे.