नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) सुरू होण्याच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. विमानतळ प्रशासनाने जाहीर केल्यानुसार, 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी पहिली मोठी प्रवासी चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. येत्या 25 डिसेंबरपासून येथे विमानसेवा सुरू होणार आहे. या चाचणीमुळे विमानतळाची ऑपरेशनल तयारी तपासण्यात आली आहे. हे विमानतळ लवकरच जनतेच्या सेवेसाठी सज्ज होईल. नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बोज कमी होण्यास मदत होणार आहे.
'NMIA'च्या ऑपरेशनल तयारीचा आढावा
प्रवाशांसाठी विमानतळावरील सेवा पूर्णपणे कार्यान्वित आहेत की नाही, हे पाहण्यासाठी ही चाचणी (ORAT) अत्यंत महत्त्वाची ठरते. NMIAने शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, शेकडो स्वयंसेवकांनी प्रवासी बनून यात भाग घेतला होता. त्यांच्यामार्फत चेक-इन, सुरक्षा तपासणी, बोर्डिंग प्रक्रिया आणि बॅगेज क्लेम यांसारख्या सर्व प्रमुख टप्प्यांची कसून तपासणी करण्यात आली. इंडिगो, अकासा आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या एअरलाईन कंपन्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला. विमानतळ सुरू करण्या पूर्वीचा हा एक महत्वाचा टप्पा समजला जातो.
मुंबई महानगर क्षेत्राला मिळणार दुसरे हवाई केंद्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी उद्घाटन झाले होते. हे विमानतळ देशातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड प्रकल्पांपैकी एक आहे. 19हजार 650 कोटी रुपये खर्चून विकसित झालेले NMIA, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA) वाढलेला ताण कमी करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. शिवाय एकाच शहरात या निमित्ताने दोन विमानतळ मिळणार आहेत.
NMIAची 'X'वर पोस्ट
NMIAने 'X'वर पोस्ट करत ORAT टीमचे, एअरलाईन भागीदारांचे, CISF चे आणि स्वयंसेवकांचे आभार मानले आहेत. अकासा एअर, इंडिगो आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या कंपन्या 25 डिसेंबर 2025 पासून NMIA वरून दिल्ली, गोवा, कोची, अहमदाबाद आणि लखनौ यांसारख्या शहरांसाठी उड्डाणे सुरू करतील. 1,160 हेक्टरमध्ये पसरलेले हे दुसरे प्रमुख हवाई केंद्र मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाला गती देईल. नवी मुंबई विमानतळावर पहिल्या फूल- स्केल प्रवासी चाचणी यशस्वी झाल्याचंही सांगण्यात आलं आहे.
Glad to be the part of full scale-integrated passenger trial that was conducted yesterday (30 November 2025) at #NMIA 🤩 pic.twitter.com/vPQTrEPRCz
— JAIDEEP (@jaideepkane) December 1, 2025
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world