- पिंपरी-चिंचवड महापालिकेची लोकसंख्या सध्या ३० लाखांच्या आसपास असून नागरी सुविधांवर ताण वाढत आहे
- महापालिकेने १६,८३८ पदांचा नवीन आराखडा तयार केला असून यामध्ये ५,३२५ नवीन पदे भरायची आहेत
- आगामी भरतीत तांत्रिक, आरोग्य, सुरक्षा व प्रशासन यांसह विविध विभागांतील रिक्त पदे भरली जाणार आहेत
सुरज कसबे
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकां पैकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विस्तार झपाट्याने होत आहे. शहराने सध्या 30 लाख लोकसंख्येचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे नागरी सुविधा पुरवताना प्रशासनावर मोठा ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी आणि कामकाजात गती आणण्यासाठी महापालिका लवकरच मोठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. या मेगा भरतीत पहिल्या टप्प्यात 471 पदांची भरती करण्याची तयारी सामान्य प्रशासन विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे बेरोजगारांसाठी ही मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचा समावेश ब वर्ग महापालिकेत झाला आहे. त्यामुळे कामाची व्याप्ती वाढली आहे. त्यानुसार प्रशासनाने सुधारित आकृतिबंध तयार केला आहे. पूर्वीच्या 11,513 पदांच्या तुलनेत आता एकूण 16,838 पदांचा नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. म्हणजेच 5,325 नवीन पदांची भरती भविष्यात केली जाणार आहे. आगामी भरती प्रक्रियेत प्रामुख्याने खालील विभागांतील रिक्त पदे भरली जाणार आहेत. यात तांत्रिक विभागात कनिष्ठ अभियंता ,अभियांत्रिकी कर्मचारी याचा खास करून समावेश आहे.
या शिवाय आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, एएनएम, आरोग्य निरीक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, सुरक्षा व स्वच्छता विभागात सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी, माळी, प्रशासन विभागात लिपिक संवर्गातील मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या जागा यांचा समावेश आहे. दरम्यान महापालिकेने ऑगस्ट 2023 मध्येच सुधारित आकृतिबंध राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
मात्र, गेल्या अडीच वर्षांपासून हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याने रिक्त पदांचा आकडा 4,668 वर पोहोचला आहे. शासनाकडून अंतिम मंजुरी मिळताच यातील मोठी पदे भरण्याचा मार्ग मोकळा होईल. सध्या तातडीची गरज म्हणून 471 पदांसाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे त्याची भरती लवकरच होणार आहे. अशा स्थिती पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी मानली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world