- यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Nasrapur Murder Case: पुण्यातील भोर जवळील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची क्रूर हत्या करणाऱ्या नराधम भीमराव कांबळे याच्या खटल्याचा अंतिम निकाल आता २९ जून रोजी जाहीर होणार आहे. पुणे कोर्ट या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार आहे. आज न्यायालयात सरकारी पक्ष आणि पीडितेच्या वडिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता सोमवारच्या निकालाकडे लागले आहे.
पीडितेच्या वडिलांची न्यायालयात विनंती
सुनावणी दरम्यान पीडितेच्या वडिलांनी न्यायाधीशांसमोर आपले म्हणणे मांडले. "यापुढे गुन्हा करण्याची हिंमत कोणी करणार नाही, अशी शिक्षा सुनावण्यात यावी",अशी विनंती पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे.
मृतदेहावरही अत्याचार; शरीरावर 18 जखमा
सरकारी वकील युक्तिवाद करताना गुन्ह्याची भीषणता आणि आरोपीच्या विकृत प्रवृत्तीचा पाढा वाचला. पोस्टमार्टेम रिपोर्टचा हवाला देत त्यांनी सांगितले की, निष्पाप चिमुरडीच्या शरीरावर तब्बल 18 गंभीर जखमा आढळल्या होत्या. नराधम भीमराव एवढ्यावरच थांबला नाही, तर चिमुरडीच्या मृत्यूनंतरही तिच्या मृतदेहावर त्याने अत्याचार केले होते. इतके अमानुष कृत्य करूनही आरोपीच्या चेहऱ्यावर गुन्ह्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.
(नक्की वाचा: Pune Nasrapur Case: नसरापूर चिमुरडी अत्याचार व हत्या प्रकरण, आरोपी भीमराव कांबळे दोषी, 29 जूनला शिक्षा सुनावणार)
आरोपी सराईत गुन्हेगार; कुटुंबानेही नाकारलेसरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, आरोपी भीमराव कांबळे हा प्रवृत्तीने अत्यंत क्रूर असून यापूर्वी त्याने एका प्राण्यावरही अत्याचार केले होते. त्याला आधीच्या काही गुन्ह्यांमध्ये शिक्षाही झालेली आहे. आरोपीच्या कृत्यामुळे त्याच्या स्वतःच्या कुटुंबीयांनीही त्याला पूर्णपणे नाकारले असून संपूर्ण खटल्यादरम्यान त्याचे कुटुंबातील कोणीही त्याला भेटायला आलेले नाही. विशेष म्हणजे, आरोपीच्या बाजूने लढण्यासाठी कोणीही वकील पुढे आलेला नाही.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणाचा अंतिम निकाल 29 जून (सोमवार) रोजी देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालय नराधमाला फाशीची शिक्षा सुनावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.