Pune News : MPSC मध्ये अपयश, तरीही 18 महिन्यात 13 लाखांचं कर्ज फेडलं; तरुणाची अवाक् करणारी कामगिरी

८ वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी केली, मात्र त्यात यश आलं नाही. शेवटी या तरुणाने आपला मार्ग बदलला, मात्र तोपर्यंत डोक्यावर मोठं कर्ज झालं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News : जगात अशक्य असं काहीच नसतं. जर जिद्द आणि अपार मेहनत करण्याची तयारी असेल तर अवघड टप्पाही पार करता येऊ शकतो. मग ते आर्थिक प्रश्न असो किंवा करिअरमधील अडथळे. पुण्यातून एक प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे. ही कहाणी आहे पोहे विकणाऱ्या एका तरुणाची. ८ वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी केली, मात्र त्यात यश आलं नाही. शेवटी या तरुणाने आपला मार्ग बदलला, मात्र तोपर्यंत डोक्यावर मोठं कर्ज झालं होतं. कुटुंबाला यातून बाहेर काढण्यासाठी हा तरुण निश्चयाने उभा राहिला आणि अशक्य वाटावी अशी किमया करुन दाखवली. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

८ वर्षे MPSC ची तयारी अन् अपयश...

ही सत्य कथा आहे पुण्यातील सुशील काटकर या तरुणाची. सलग ८ वर्षे MPSC ची तयारी करूनही सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण झालं नाही. यादरम्यान त्यांच्या कुटुंबावर १२ ते १३ लाख रुपयांचे मोठे कर्ज झाले होते. पदरी अपयश आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर अशा कठीण परिस्थितीत सुशील यांनी खचून न जाता आपल्या आयुष्याचा 'प्लॅन बी' अमलात आणण्याचे ठरवले. 

Advertisement

अन् सुरू झाली 'काटकर पोहे' ब्रँडची सुरुवात...

२०१८ मध्ये पूर्व परीक्षेत (Prelims) अपयश आल्यानंतर त्याने पुण्यात 'काटकर पोहे' या नावाने स्वतःचा स्टॉल सुरू केला. सुरुवातीला हा प्रवास सोपा नव्हता, पण हळूहळू त्यांच्या पोह्यांना पुणेकरांची आणि विशेषतः स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी पसंती मिळाली. 

१८ महिन्यांत फेडलं कर्ज...

एका नोकरीत राहून जे करणं शक्य झालं नसतं ते सुशीलने करुन दाखवलं आहे. सुशीलच्या पोह्यांच्या स्टॉलवर दररोज दोन पोते पोह्यांचा खप होतो. विशेष म्हणजे अवघ्या १८ महिन्यात सुशीलने त्याच्या कुटुंबावरील १२ ते १३ लाखांचं कर्ज पूर्णपणे फेडलं आहे. MPSC मध्ये यश मिळालं नाही तरी आयुष्य संपत नाही, प्रामाणिक कष्ट केले तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते, असा मोलाचा संदेश सुशील काटकरने आपल्या कामातून दिलं आहे. या प्रवासात पुणेकर आणि त्याच्या स्पर्धा परीक्षेतील मित्र-मैत्रिणींचे मोठे सहकार्य लाभले हे सुशील आवर्जुन सांगतो. 

Topics mentioned in this article