- पुणे जिल्ह्यात 2 एप्रिल 2026 रोजी झालेल्या अवकाळी पावसाने 12 तालुक्यांतील 105 गावांमध्ये मोठे नुकसान झाले
- प्राथमिक अंदाजानुसार अवकाळी पावसामुळे तब्बल 1785 हेक्टरवरील गहू, कांदा, बाजरी आणि मका पिकांचे नुकसान झाले
- अवकाळी पावसामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला असून खेड तालुक्यात झाड कोसळून गाईचा देखील मृत्यू झाला आहे
अवकाळी पावसाचा तडाखा पुणे जिल्ह्याला बसला आहे. पुणे जिल्ह्यात 2 एप्रिल 2026 रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत केले आहे. जिल्ह्यातील 12 तालुक्यांतील 105 गावांमध्ये निसर्गाचा कोप पाहायला मिळाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार 1785 हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुणे शहरात 57 मिमी, तर जिल्ह्यात सरासरी 9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुणेकरांची गुरुवारची रात्र मोठी दाणादाण उडवणारी ठरली. सोसाट्याचा वारा आणि गारपिटीसह आलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. तब्बल 105 गावांमध्ये पावसाने हजेरी लावली असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गहू, कांदा आणि फळबागांचे अक्षरशः मातेरं झालं आहे.
या नैसर्गिक आपत्तीत दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. पर्वती परिसरातील लक्ष्मीनारायण सोसायटीजवळ अंगावर झाड पडल्याने रंजना गिरी (57) यांचा मृत्यू झाला. दुसरी घटना खेड तालुक्यातील तळवडे येथे घडली असून, पोल्ट्रीचे काम सुरू असताना भिंत कोसळून अलका मुसळे (53) यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय, खेड तालुक्यातील कडूस येथे झाडाची फांदी पडून एका गाईचाही मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभाग सर्व यंत्रणांशी समन्वय राखून आहे. नुकसानग्रस्त भागाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून बाधित नागरिकांना आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अवकाळीचा सर्वाधिक फटका गहू, कांदा, बाजरी आणि मका या पिकांना बसला आहे. त्यासोबतच आंबा, द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागांचेही नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले असून नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 020- 26123371 किंवा 9370960061 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभाग सर्व यंत्रणांशी समन्वय राखून आहे. नुकसानग्रस्त भागाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून बाधित नागरिकांना आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.