देविदास राखुंडे, पुरंदर
सोशल मीडियावरील प्रसिद्धीचा गैरफायदा घेत टोल भरण्यास नकार देणाऱ्या रीलस्टारला धडा शिकवण्यासाठी किंवा त्याचा हट्ट पुरवण्यासाठी एका टोल कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने (CEO) अत्यंत अजब आणि अनोखा निर्णय घेतला आहे. पुरंदरमधील जेजुरी नजीक असलेल्या बेलसर टोल नाक्यावर आता 'रीलस्टार' महेश मोटे याला टोल भरावा लागणार नाही. त्याच्या वाट्याची टोलची रक्कम कंपनीचे सीईओ अभयसिंह हुले पाटील स्वतः भरणार आहेत.
नेमका काय होता वाद?
मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात जेजुरी येथील बेलसर टोल नाक्यावर महेश मोटे हा आपल्या गाडीने आला होता. टोल कर्मचाऱ्यांनी त्याला टोलची रक्कम मागितली असता, त्याने टोल भरण्यास साफ नकार दिला आणि तिथे मोठा गोंधळ घातला.
"मी रिलस्टार आहे, मी टोल देणार नाही," अशी उद्दाम भूमिका त्याने घेतली होती. या वादामुळे टोल नाक्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि या घटनेचा व्हिडिओ आणि बातमी सोशल मीडियावर प्रचंड चर्चिले गेले होते.
(नक्की वाचा- VIDEO: "मी रील स्टार आहे, माझी गाडी का अडवली?", टोलमाफीसाठी क्रिएटरची चिंधीगिरी, कर्मचाऱ्यांशी हुज्जत)
सीईओ अभयसिंह हुले पाटील यांची मोठी घोषणा
रीलस्टारच्या या अजब दाव्यानंतर आणि झालेल्या वादानंतर बेलसर टोल नाक्याच्या ठेकेदार कंपनीचे सीईओ अभयसिंह हुले पाटील यांनी तातडीने एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महेश मोटे याच्याबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. "महेश मोटे याला सोशल मीडिया रील बनवण्याचा मोठा अभिमान आहे आणि तो स्वतःला रीलस्टार समजून टोल भरण्यास नकार देत आहे. त्यामुळे आता त्याला बेलसर टोल नाक्यावर थांबवून त्याचा वेळ वाया घालवला जाणार नाही. त्याच्या गाडीचा जो काही टोल होईल, ती सर्व रक्कम मी स्वतः माझ्या खिशातून भरेन," अशी घोषणा अभयसिंह हुले पाटील यांनी केली.
(नक्की वाचा- Vaibhav Sooryavanshi: वैभवसमोर मोठा पेच; अलिशान कार जिंकली, पण एक खंत सतत सतावेल!)
कंपनीच्या सर्वोच्च अधिकाऱ्याने एका उद्धट रीलस्टारची टोल भरण्याची जबाबदारी स्वतः स्वीकारल्यामुळे या निर्णयामागे रीलस्टारची जिरवण्यासाठी केलेली ही एक उपरोधिक चाल असल्याची चर्चा आता स्थानिक नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. टोल नाक्यांवर अनेकदा व्हीआयपी किंवा स्थानिक असल्याचे सांगून वाद घालणारे अनेक जण पाहिले जातात. मात्र 'मी रिलस्टार आहे' असे सांगत टोल टाळण्याचा हा एक नवाच प्रकार पुरंदरमध्ये समोर आला होता.