Pune News: धक्कादायक! राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये रॅगिंग? कॅडेटसोबत भयंकर घडलं

ही घटना अतिशय गंभीर असून संपूर्ण राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये याचे पडसाद उमटले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

सूरज कसबे 

पुण्याजवळील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) मध्ये एका 18 वर्षीय कॅडेटचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लखनऊ, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेला पहिला टर्म कॅडेट अंत्रीक्ष कुमार सिंग हा 10 ऑक्टोबर 2025  शुक्रवारी पहाटे हॉस्टेलमधील आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळला. या घटनेनंतर मृत कॅडेटच्या कुटुंबीयांनी थेट 'रॅगिंग'चा आरोप केल्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. ही घटना अतिशय गंभीर असून संपूर्ण राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये याचे पडसाद उमटले आहेत.  

काय आहे नेमकी घटना ?
सकाळच्या नियमित प्रशिक्षणासाठी अंत्रीक्ष गैरहजर राहिल्याने त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला शोधले. तेव्हा तो खोलीत बेडशीटला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तातडीने खडकवासला येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उत्तम नगर पोलिसांनी या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू (Accidental Death Report) म्हणून केली आहे. कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक तपासात पोलिसांनी आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे.

नक्की वाचा - Ladaki bahin Yojana: आता 'या' संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध, दिवाळीचा हाफ्ता कधी जमा होणार?

कुटुंबीयांकडून रॅगिंगचा गंभीर आरोप
माजी सैनिकाचा मुलगा असलेला अंत्रीक्ष कुमार सिंग हा हवाई दलात अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन काही महिन्यांपूर्वीच अकादमीत दाखल झाला होता. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. "मागील काही दिवसांपासून सीनियर कॅडेट्सकडून अंत्रीक्षला खूप त्रास दिला जात होता. आम्ही ही बाब अकादमीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. पण दुर्लक्ष झाले. हा छळ असह्य झाल्यानेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे असा आरोप त्यांनी केला आहे. हा रॅगिंगचाच प्रकार आहे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. अशा भावना त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत. कुटुंबीयांनी पुणे पोलिसांकडेही आपला जबाब नोंदवला आहे.

नक्की वाचा - Viral video: ही अमेरिकन महिला म्हणते भारतात अजिबात जाऊ नका, कारण ऐकून धक्का बसेल

पोलिस आणि NDA प्रशासनाची भूमिका काय ?
पुणे पोलिसांनी या प्रकरणाची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. शिवाय आम्ही याचा सखोल तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि सर्व बाजूंच्या चौकशीनंतरच मृत्यूच्या नेमक्या कारणाबद्दल भाष्य करता येईल असं पोलीसंनी सांगितलं आहे. रॅगिंगच्या आरोपाची अद्याप पुष्टी झालेली नाही असं ही पोलीसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, एनडीए प्रशासनाने या दुःखद घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अकादमीने एका अधिकृत निवेदनात, घटनेमागील परिस्थितीचा पूर्ण तपास करण्यासाठी 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी' (Court of Inquiry) करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस आणि एनडीएची 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी' अशा दोन्ही स्तरांवर या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

Advertisement