- चिंचवड येथील श्री आदेश्वर शंकेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिरात पुजाऱ्याचा वेश घालून चोरट्याने चोरी केली होती
- नरेश अगरचंद जैन नावाच्या चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे
- चोरट्याने देवाच्या चांदीच्या मुकुटावर चोरी करून तो कपड्याने झाकून मंदिरातून पळ काढला होता
सुरज कसबे
देवाच्या दर्शनासाठी अनेक भक्त मंदिरात येत असतात. तर मंदिरात पुजारी ही देवाच्या सेवेसाठी असतात. मंदिरात देवाचं दर्शन घेतल्यानंतर भक्तांचे मन प्रसन्न होतं. त्यामुळे अनेक भक्त हे मंदिरात दर्शनासाठी जात असतात. पण काही भक्त असे ही असतात त्यांचा मंदिरात जाण्याचा उद्देश इतरां पेक्षा फार वेगळा असतो. अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चिंचवडमध्ये घडली आहे. इथं एका चोराने चोरी करण्याच्या उद्देशाने थेट पुजाऱ्याचा वेश घेतला होता. सर्वा काही त्याच्या मनासारखे झाले होते. पण त्याची एक चुक नडली आणि खेळ खल्लास झाला.
चिंचवड येथे भगवान श्री आदेश्वर शंकेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिर आहे. या मंदिरात चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने अवघ्या 48 तासांत बेड्या ठोकल्या आहेत. नरेश अगरचंद जैन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चोरी करण्यासाठी या भामट्याने भन्नाट शक्कल लढवली होती. त्याने पुजाऱ्याची वेशभूषा केली होती. त्यानंतर तो मंदिरात चोरी करण्यासाठी गेला. सर्व काही त्याच्या प्लॅन प्रमाणे होत होते. त्याने मंदिरात प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी देवाचे दर्शन घेतले.
त्यानंतर संधी साधून देवाच्या चांदीच्या मुकूटावर डल्ला मारला. हा मुकूट साधारण अडीच लाख रुपये किमतीचा होता. तो मुकूट त्याने कपड्याने झाकला. आपला डाव यशस्वी झाला हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर तो तिथून मुकुट घेवून तो शिताफीने मंदिरातून पसार झाला. मात्र तो एक गोष्ट विसरला. ती म्हणजे या मंदिरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे. या कॅमेऱ्यानी चोराची प्रत्येक एक कृती कैद केली होती. याचा मात्र त्याला विसर पडला होता. त्यामुळे ती बिनधास्त पणे तिथून पळून गेला. आता आपली मजा आहे याची स्वप्न तो पाहात होता.
चोरी झाल्याचे मंदिर प्रशासनाला समजले. त्यानंतर त्यांनी तातडीने याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा युनिट 1 ने तपासाची चक्रे फिरवली. त्यांनी सीसीटीव्ही ताब्यात घेतली. त्यावरून चोराची ओळख पटली. त्यानंतर पुढील 48 तासांत आरोपीला जेरबंद करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश जैन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये 12 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला असून अधिक तपास सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world