- अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान मोठ्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरले
- चोरांनी 20 लाख किंमतीचे दागिने चोरले आहेत
- बारामती पोलिसांनी सात आरोपींना बीड, यवतमाळ आणि अहिल्यानगर येथून अटक केली आहे
देवा राखुंडे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामतीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात देशभरातून लोक आले होते. मोठी गर्दी झाली होती. याच भल्या मोठ्या गर्दीचा गैरफायदा चोरट्यांनी घेतला. यावेळी अज्ञात चोरट्यांनी उपस्थित नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या तसेच रोख रक्कम लंपास केला. या अंत्ययात्रेत अनेकांचे दागिने चोरीला गेला. अंदाजे 20 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याचे समोर आला आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते.
बारामती तालुका पोलिसांनी याचा शोध घेतला. त्यांनी या प्रकरणी सात चोरट्यांना अटक केली आहे. त्यात राजकुमार बाबुराव आठवले , मोहम्मद अनीस मोहम्मद युनूस , एजाज भगु मीरावले , मोहम्मद सादिक मोहम्मद गफार, बाळू उर्फ दत्तात्रय बबन धोत्रे, तुषार कैलास मासाळ, नितीन अंकुश गायकवाड या आरोपींना बारामती तालुका पोलिसांनी अटक आली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार फिर्यादी रणजीत बाळासाहेब जाधव तसेच साक्षीदार विश्वजीत अनिल तुपे, अंकुश शांताराम दिघे, प्रशांत लक्ष्मण सपकाळ, विकास कैलास भागवत, रणजीत मधुकर भोंगळे व इतर यांच्या सोन्याच्या चैन रोख रक्कम असा अंदाजे 20 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले होते.
गुन्हा दाखल होताच बारामती पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. त्यानुसार पोलीसांनी आरोपींना बीड, यवतमाळ, अहिल्यानगर इथून अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल व रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी पोलीस तपास सुरू असून, आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
तपासात पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, सहा.पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र वाघ, पोलीस हवालदार किशोर वीर, तसेच पोलीस अंमलदार राजू बन्ने, मनोज पवार, जितू शिंदे, हनुमंत खटके यांनी सहभाग घेतला आहे. गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील हे करत आहेत. अंत्ययात्रेत ही चोरट्यांनी डल्ला मारला याबाबत बारामतीत संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे सर्व जण शोकसागरात बुडाले असताना दुसरीकडे मात्र या चोरांचे वेगळेच उद्योग सुरू असल्याचं दिसून आलं आहे.