लोणावळा ते कर्जत दरम्यानच्या घाट विभागात मुसळधार पाऊस झाला होता. यामुळे या भागातील तिसऱ्या रेल्वे मार्गाचे मोठे नुकसान झाले होते. या मार्गिकेच्या दुरूस्तीचे काम मध्य रेल्वेकडून युद्धपातळीवर सुरू आहे. मध्य रेल्वेने डाऊन आणि मध्य मार्गिका पूर्ववत केली आहे. त्यानंतर आता तिसऱ्या मार्गिकचे काम वेगाने हाती घेतले आहे. अभियांत्रिकी पथक, तांत्रिक कर्मचारी आणि यंत्रसामग्री या ठिकाणी दरड- मातीचा ढिगारा हटवण्यासाठी काम केले जात आहे. 24 तासापासून हे काम केले जात आहे. मात्र, ही मार्गिका पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत रेल्वे प्रशासनाने 28 जुलैपर्यंत मेल-एक्स्प्रेस गाड्यांवरील निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे या मार्गावर मेल एक्सप्रेस धावणार नाहीत.
या निर्णयामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चेन्नई, हैदराबाद, इंदूर-दौंड, जोधपूर-हडपसर आणि दादर-साईनगर शिर्डी यांसारख्या अनेक गाड्या काही काळासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय विशाखापट्टणम, मदुराई, कारैकाल, सिकंदराबाद, राजकोट, पोरबंदर आणि कोईम्बतूर मार्गिकेवरील गाड्या दौंड-मनमाड-इगतपुरी-कल्याण तसेच सुरत-पाळधी-मनमाड या पर्यायी मार्गांनी वळवण्यात आल्या आहेत.
प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या मदत क्रमांकावर, एनटीईएस अॅपवर किंवा अधिकृत सोशल मीडिया खात्यांवर अद्ययावत माहिती तपासून सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. अजून काही दिवस लोणावळा ते कर्जत मध्य रेल्वे काम करणार आहे. तिसरा मार्ग ही लवकर सेवेत आणण्यासाठी कठोर मेहनत घेतले जात आहेत. त्याला काही दिवसात यश येईल असा विश्वास मध्य रेल्वेने व्यक्त केला आहे. या भागात अजून ही पावसाची ये जा आहे. त्यामुळे दुरूस्ती कामात अडचणी येत आहेत. मात्र तरी ही त्यातून मध्य रेल्वेने अविरत काम सुरू ठेवले.