यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News : पुण्यातील पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि सतर्क करणारी बातमी समोर आली आहे. आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी शाळा प्रवेशाची धावपळ सुरू असतानाच पुणे महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत शाळांचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शहरातील 13 शाळांकडे कोणतीही अधिकृत मान्यता नसल्याचे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जर तुम्ही या शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा विचार करत असाल, तर वेळीच सावध होण्याची गरज आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शहराच्या विविध भागांतील शाळांची तपासणी केल्यानंतर ही यादी प्रसिद्ध केली आहे. नियमानुसार, प्रत्येक शाळेला सरकारची आणि स्थानिक प्रशासनाची रितसर मान्यता असणे अनिवार्य असते.
मात्र, या 13 शाळांनी आवश्यक परवानग्या न घेताच आपले कामकाज सुरू ठेवल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने या शाळांना अनधिकृत ठरवून पालकांना अशा शाळांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. या शाळांना शासनमान्य निकाल किंवा प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे अशा शाळेतून मिळालेली गुणपत्रिका पुढील शिक्षणासाठी ग्राह्य धरली जात नाही. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये आणि पालकांची आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेची मान्यता नक्की तपासा, असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
( नक्की वाचा : Pune News: पर्वती प्रकरणाने पुणे सुन्न! 'माझ्या नराधम बापाला फाशीच द्या', पीडित मुलीच्या आईचा टाहो )
या भागात आहेत अनधिकृत शाळा
या यादीमध्ये प्रामुख्याने कोंढवा, हडपसर, उंड्री, बिबवेवाडी आणि येरवडा यांसारख्या विकसित भागांतील शाळांचा समावेश आहे. अनेक प्रसिद्ध वाटणाऱ्या शाळांचाही यात समावेश असल्याने पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास उद्भवणाऱ्या कोणत्याही अडचणीला पालक स्वतः जबाबदार राहतील.
( नक्की वाचा : Pune News: पुणे विद्यापीठात प्राध्यापक व्हायचंय? मग 1 कोटी रुपये तयार ठेवा; भरती प्रक्रियेत झोल असल्याचा आरोप )
पुण्यातील 13 अनधिकृत शाळांची यादी पुढीलप्रमाणे आहे
न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल बिबवेवाडी पोलीस स्टेशन जवळ चिंतामणी नगर, पुणे
महात्मा गांधी प्रशाला प्लॉट न. 52, लेन न. 2B संजय पार्क, येरवडा, पुणे
टीम्स तकवा इस्लामिक स्कूल ऍण्ड मक्तब, NIBM रोड कोंढवा खु पुणे
सेंट व्ह्यू इन्टरनॅशनल स्कूल कोंढवा बु पुणे
इमॅन्युअल पब्लिक स्कूल, महमंदवाडी रोड हडपसर पुणे
आकांक्षा अॅकॅडमी स्कूल अजिंक्य डी. वाय. पाटील रोड लोहगाव पुणे
एलोरा मेडिकल अॅण्ड एज्युकेशन फौंडेशन आर्यन पब्लिक स्कूल मानाजी नगर नन्हे, पुणे
लेगसी हाय स्कूल अश्रफ नगर कोंढवा बु पुणे
शिबली नोमानी इंग्लिश मिडीयम स्कूल अश्रफ नगर कोंढवा बु पुणे
ऑर्चीड द इंटरनॅशनल स्कूल, उंड्री ता. हवेली पुणे
ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट पुणे इकरा इस्लामिक स्कूल, कौसरबाग कोंढवा पुणे
ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूल, आंबेगाव बु पुणे
आर्यन वर्ल्ड स्कूल, उंड्री पुणे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world