सूरज कसबे
सापाना खाण्यासाठी उंदीर. ते ही पांढरे उंदीर दिले जात असतील तर. तुम्ही थोडा विचार कराल ना. पण हो हे खरं आहे. बरं या पांढऱ्या उंदरांसाठी तब्बल एक दोन नाही तर आठ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. ज्या सापांसाठी हे उंदीर खरेदी केले गेले आहेत ते पुढील दोन वर्ष त्यांना पुरवले जाणार आहेत. म्हणजे वर्षाला सापांच्या खाण्यावर सरासरी चारलाख खर्च केले जात आहेत. म्हणजेच एका चांगल्या कंपनीत काम करणाऱ्या नोकरदाराच्या पगारा येवढा खर्च सापांच्या खाण्यावर केला जात आहे अशी चर्चा या निमित्ताने केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पिंपरी चिंचवड शहरातील गेल्या नऊ वर्षांपासून बंद असलेल्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयातील 52 सापांसाठी 8 लाख 61 हजार 840 रुपयांचे पांढरे उंदीर खरेदी केले आहेत. प्रति उंदीर 159 रुपये दराने ही खरेदी करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी हे उंदीर खाद्य म्हणून पुरविले जाणार आहे. एक किंवा दोन उंदीर आठवड्यातून या सापांना खायला दिले जाणार आहेत. या उंदीर खरेदीची चर्चा सघ्या पिंपरी चिंचडवडमध्ये रंगली आहे.
नूतनीकरणासाठी बंद असलेल्या या प्राणी संग्रहालयात सर्प, विविध जातीचे पक्षी , मगर, कासव यांना पालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाच्या वतीने सांभाळण्यात येत आहेत. मात्र त्याचं इतर प्राणी संग्रहालयात ही स्थलांतर करण्यात आले असते. पण त्या ठिकाणी जागा नसल्याने आम्हाला ते सांभाळावे लागत असल्याचे पशु वैद्यकीय अधिकारी अरुण दगडे यांनी सांगितले. त्यामुळे त्यांची जबाबदारी ही इथल्याच प्रशासनावर पडत आहे.
या प्राण्याच्या स्थलांतरासाठी पुणे, मुंबई ,छत्रपती संभाजीनगर येथील प्राणी संग्रहालयाशी पत्र व्यवहार देखील करण्यात आला होता. मात्र त्याच्याकडे जागा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या 9 वर्षांपासून लाखों रुपये या प्राण्यावर खर्च केले जात आहेत. हे प्राणी संग्रहालय सुरू करण्यासाठी आजुन किती वेळ लागणार याबाबत काही माहिती समोर आली नाही. मात्र या प्रशासन प्राणी संग्रहालयातील प्राणी सांभाळण्यासोबत ठेकेदार ही सांभाळत असल्याचे दिसून येत आहे.