अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी
Pune News: पुण्याचं हृदय समजली जाणारी सारसबाग आणि तिथलं पेशवेकालीन तळ्यातलं गणपती मंदिर दोन दिवस भाविक आणि पर्यकांसाठी बंद राहणार आहे. 28 आणि 29 मे रोजी हे ठिकाण पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला महापालिकेकडून वेगळं कारण देण्यात आलं होतं, मात्र आता पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर या निर्णयाचं स्वरूप बदललं आहे.
महापौर आणि पोलिसांच्या भूमिकेत विसंगती
पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी या संदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला महापौरांच्या सोशल मीडिया टीमकडून मंदिर दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, काही वेळातच ही माहिती बदलण्यात आली.
पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग आणि मंदिर परिसर दोन दिवस बंद ठेवला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. महापौरांनी आपली बाजू मांडताना सांगितलं की, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय झाला असून, केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण ही माहिती पुणेकरांपर्यंत पोहोचवली आहे.
वादाची पार्श्वभूमी आणि बकरी ईदचं कनेक्शन
29 मे रोजी देशभरात बकरी ईद साजरी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सारसबाग बंद ठेवण्यात आल्यानं शहरात राजकीय आणि सामाजिक चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही काळापासून सारसबाग हे ठिकाण धार्मिक वादाचं केंद्र ठरलं आहे. बागेतील हिरवळीवर विशिष्ट समुदायाकडून मांसाहार केला जातो, ज्यामुळे मंदिराचं पावित्र्य धोक्यात येत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटना करत आहेत.
मागील वर्षी जून 2025 मध्येही भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी या संदर्भात पत्र दिल्यानंतर बकरी ईदच्या दिवशी बाग बंद ठेवण्यात आली होती. यावर्षी पुन्हा एकदा सुरक्षेचं कारण देत तोच कित्ता गिरवण्यात आल्यानं प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.