अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune News Today : घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केवायसी (KYC) पूर्ण न केलेल्या ग्राहकांना घरगुती गॅस सिलिंडर मिळणार नाही,असा निर्णय गॅस कंपन्या आणि वितरकांच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी अनेक ठिकाणी सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.
पुणे आणि परिसरातील गॅस वितरकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. केवायसी पूर्ण नसल्यास ऑनलाइन बुकिंगदेखील स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे अनेक ग्राहकांना सध्या बुकिंग करताना अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.
दोन सिलिंडरमधील अंतर 30 दिवसांवर
याशिवाय गॅस वितरणसंदर्भात आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी घरगुती गॅसच्या दोन सिलिंडरमधील किमान अंतर 21 दिवस होते. मात्र आता ही मर्यादा वाढवून 30 दिवस करण्यात आली आहे. म्हणजेच ग्राहकांना नवीन सिलिंडर बुक करण्यासाठी आधीच्या सिलिंडरनंतर किमान 30 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.या बदलामुळे प्रत्यक्षात ग्राहकांना आठ दिवस जास्त प्रतीक्षा करावी लागणार असून त्याचा परिणाम गॅस उपलब्धतेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा >> Ind vs Nz : भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यात पाऊस पडणार का? अहमदाबादमध्ये काय आहे हवामानाची स्थिती? जाणून घ्या
केवायसी प्रलंबित असल्याने वितरकांवर ताण
गॅस कंपन्या आणि वितरक यांच्यात नुकतीच ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत केवायसी प्रलंबित असलेल्या मोठ्या संख्येतील ग्राहकांमुळे वितरण व्यवस्थेवर ताण येत असल्याचे सांगण्यात आले. अनेक ग्राहकांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने वितरकांकडे गॅसचा साठा आणि पुरवठा व्यवस्थापनावर परिणाम होत असल्याची माहिती देण्यात आली. भारतातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या जसे की इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्थान पेट्रोलियम यांच्या वितरण साखळीवरही या प्रक्रियेचा परिणाम होत असल्याचे वितरकांचे म्हणणे आहे.
युद्धजन्य परिस्थितीचा इंधन पुरवठ्यावर परिणाम
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावरही दबाव वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.कच्च्या तेलाच्या पुरवठ्यातील अनिश्चितता,वाहतूक खर्च आणि साठा व्यवस्थापन या कारणांमुळे एलपीजीसह इतर इंधनांच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम घरगुती गॅससह व्यावसायिक गॅस सिलिंडरवरही होऊ शकतो,असे वितरकांचे म्हणणे आहे.
नागरिकांना आवाहन
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गॅसचा वापर शक्य तितका काटकसरीने करावा,असे आवाहन वितरकांकडून करण्यात येत आहे. तसेच ज्यांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी तातडीने ती पूर्ण करावी, अन्यथा गॅस बुकिंग आणि वितरणात अडचणी येऊ शकतात. दरम्यान, पुढील काही दिवसांत गॅस पुरवठ्याची परिस्थिती कशी राहते आणि या नव्या नियमांचा प्रत्यक्ष परिणाम किती होतो, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world