पुण्यात यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान सुरक्षेसाठी पुणे पोलिसांनी एक नवे पाऊल उचलले. पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सक्षम सीसीटीव्ही प्रणाली आणि रिअल-टाइम ॲनालिटिक्सचा उपयोग करून मोठ्या गर्दीवर लक्ष ठेवले आणि संभाव्य धोके ओळखून ते वेळीच टाळले. या तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही, ज्यामुळे नागरिक आणि अधिकारी दोघांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
शनिवारी हजारो भाविक विसर्जन मार्गांवर जमा झाले होते, परंतु शहरातील प्रमुख मिरवणूक मार्ग एआय (AI) आणि फेशियल रिकग्निशन असलेल्या कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली होते. हे सर्व कॅमेरे शिवजीनगरमधील नियंत्रण केंद्राशी जोडलेले होते. त्याचवेळी, फरासखाना पोलीस ठाण्यातील एका 'वॉर रूम'मधून मैदानावर काम करणाऱ्या पोलीस पथकांशी समन्वय साधला जात होता.
250 संशयित व्यक्तींना पकडले, 2,000 हून अधिक अलर्ट
सहाय्यक पोलीस आयुक्त (माहिती तंत्रज्ञान) विवेक पवार यांनी सांगितले की, "85 टक्के अचूकतेच्या उच्च स्तरावर, सुमारे 250 व्यक्तींना संशयित म्हणून चिन्हांकित करण्यात आले आणि गुन्हे शाखा अधिकाऱ्यांनी त्यांची पडताळणी केली. 80 टक्के अचूकतेच्या श्रेणीत 2,000 हून अधिक अतिरिक्त अलर्ट्स जारी झाले."
"हे तंत्रज्ञान केवळ गुन्हेगारांना पकडण्यासाठी नसून, गुन्हेगारी प्रतिबंधासाठी आहे. या साधनांचा वापर करून, आम्ही परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच कारवाई करू शकतो. लवकरच ही प्रणाली शहराच्या इतर गुन्हेगारी-प्रवण भागांमध्येही वापरली जाईल", असंही विवेक पवार यांनी सांगितलं.
शहरी पोलिसांसाठी एक मॉडेल
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मैदानावर काम करणाऱ्या पथकांचा आणि आयटी विभागाचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा ठरला. पुणे पोलिसांची ही योजना एक 'स्मार्ट पोलिसिंग'चे उदाहरण आहे, जी परंपरा आणि तंत्रज्ञानाचा यांचा उत्तम समन्वय साधून मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरक्षित ठेवते.