अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशनवर सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्याच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी स्वतः स्टेशनची पाहणी केल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पुणे स्टेशन हे चोऱ्या, अमली पदार्थांचे सेवन आणि गुन्हेगारीचे केंद्र बनत चालले आहे की काय, असा गंभीर सवाल या पाहणीनंतर उपस्थित होत आहे. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा यामुळे प्रवाशांचे जगणे कठीण झाले असून, आता या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल थेट केंद्र सरकारला दिला जाणार आहे.
प्रवाशांच्या तक्रारीनंतर प्रत्यक्ष पाहणी
पुणे रेल्वे स्टेशनबाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी सातत्याने येत होत्या. या तक्रारींची दखल घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी स्वतः स्टेशनवर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांना अनेक धक्कादायक बाबी आढळून आल्या. 'मी प्लॅटफॉर्म तिकीट काढून आत गेले, पण तिथे अनेक लोक विना तिकीट बिनधास्त फिरताना दिसले. रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या-जाणाऱ्यांवर कोणतीही देखरेख नसल्याचे चित्र तिथे पाहायला मिळाले', असे कुलकर्णी यांनी सांगितले.
( नक्की वाचा : 60 फूट खोल खड्डा आणि 50 तासांचा थरार! 20 वर्षांपूर्वी मृत्यूला हरवणारा Borewell Boy 'प्रिन्स' आता काय करतो? )
सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा आणि गुन्हेगारी
रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेली यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याचे मेधा कुलकर्णी यांच्या निदर्शनास आले आहे. स्टेशन परिसरात अनेक लोक उघडपणे अमली पदार्थांचे सेवन करताना आणि व्यसनाच्या आहारी गेलेले आढळले. यामुळेच इथे चोऱ्या, मारामारी आणि महिलांवरील अत्याचारासारख्या घटना वारंवार घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तपासणीसाठी कोणतीही ठोस यंत्रणा कार्यान्वित नसल्याने गुन्हेगारांचे फावले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अधिकारी आणि पोलिसांच्या हलगर्जीपणावर बोट
स्टेशनवर केवळ ठराविक ब्रँड्सनाच स्टॉल चालवण्यास प्राधान्य दिले जात असून स्थानिक गरजू व्यक्तींना तिथे स्थान मिळत नसल्याची तक्रारही त्यांनी केली. एका स्टॉलची तपासणी केली असता तिथे एकही मराठी माणूस काम करताना दिसला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. रेल्वेचे अधिकारी आणि पोलीस यांच्या हलगर्जीपणामुळेच पुणे स्टेशनची ही अवस्था झाली असून, याला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : Pune News: हिंजवडीत नाशिक प्रकरणाची पुनरावृत्ती? IT कंपन्यांमधील 'त्या' धक्कादायक प्रकाराची थेट सरकारकडून दखल )
केंद्राकडे लेखी अहवाल आणि कठोर कारवाईची मागणी
पुणे रेल्वे स्टेशनवरील या भोंगळ कारभाराबाबत खासदार मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी निधी मिळाला असला तरी इतर सुरक्षा मानके पाळली जात नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. येत्या काळात डीआरएम यांची भेट घेऊन या सर्व तक्रारी मांडल्या जातील आणि त्यानंतरही समाधानकारक बदल न झाल्यास केंद्र स्तरावर पाठपुरावा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world