Pune News : पुणेकरांची कटकट संपणार, रिंग रोडसाठी प्रशासनाची मोठी झेप, असा असेल तुमचा नवा हायवे, वाचा सविस्तर

Pune Ring Road Update: पुणेकरांचा रोजचा प्रवास म्हणजे वाहतूक कोंडी आणि मानसिक त्रासाचे समीकरण झाले आहे

जाहिरात
Read Time: 3 mins
Pune News : पुणे रिंग रोड हा राज्यातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे.
मुंबई:

Pune Ring Road Update: पुणेकरांचा रोजचा प्रवास म्हणजे वाहतूक कोंडी आणि मानसिक त्रासाचे समीकरण झाले आहे. मात्र, आता हे चित्र कायमचे बदलण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले आहे. ज्या प्रकल्पाची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती, त्या पुणे रिंग रोडच्या कामाला आता प्रत्यक्ष वेग आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पातील पश्चिम कॉरिडोरचे काम अत्यंत जलद गतीने सुरू झाल्याने मुंबई ते बंगळुरु दरम्यानचा प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गेल्या जवळपास 1 वर्षापासून या रिंग रोडच्या कामाला सुरुवात झाली असून, हा मार्ग 168.60 किमी लांब असणार आहे. या बाह्य रिंग रोडची रुंदी 110 मीटर इतकी असेल. या मार्गाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यामुळे मुंबई ते बंगळुरु प्रवासासाठी कोणालाही पुणे शहरात शिरण्याची गरज उरणार नाही. शहराच्या बाहेरूनच हा सुसाट मार्ग उपलब्ध होणार असल्याने प्रवासाचा वेळ कमालीचा वाचणार आहे.

काय आहे प्रकल्प?

पुणे रिंग रोड हा राज्यातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असून, यासाठी सुमारे 55,622 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा रस्ता केवळ लांबच नाही, तर तो तांत्रिकदृष्ट्याही प्रगत असणार आहे. या संपूर्ण मार्गावर 8 दुहेरी बोगदे, 7 मोठे मार्ग आणि 10 पेक्षा जास्त पूल बांधले जाणार आहेत. 

याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी 26 मध्यम पूल, 21 ओव्हरपास आणि 9 पादचारी मार्ग तयार करण्यात येणार आहेत. सध्या यातील पश्चिम कॉरिडॉरवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, त्याचे काम वेगाने पुढे सरकत आहे. यामुळे मुंबई, बंगळुरु आणि सातारा, सांगली, कोल्हापूर यांसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा प्रवास अतिशय सोपा होईल.

Advertisement

( नक्की वाचा : Maharashtra Budget 2026: पुणे मेट्रो आता सासवड, वाघोलीच्या दारात; बजेटमध्ये पुण्याच्या पायाभूत सुविधांचा धमाका )

वाहतूक कोंडीमुक्त आणि सुरक्षित प्रवास

शहरातील गर्दी टाळण्यासाठी या रिंग रोडवर संपूर्णपणे अंडरपास आणि ओव्हरपासची रचना करण्यात आली आहे. यामुळे वाहनचालकांना कुठेही थांबावे लागणार नाही आणि वाहतूक कोंडीचा प्रश्नच उरणार नाही. 

सुरक्षिततेचा विचार करून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भक्कम कुंपण घातले जाणार आहे. पश्चिम कॉरिडॉरचे वैशिष्ट्य म्हणजे तो मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील उर्से येथून सुरू होऊन थेट पुणे-बंगळुरु महामार्गावरील शिवारे या गावाला जोडला जाणार आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Pune News: पुणे मेट्रोचा धमाका! कॅम्प, पुलगेटमार्गे थेट उंड्री गाठता येणार, वाचा कुठून जाणार ट्रेन )

दोन टप्प्यातील भव्य प्रकल्प

हा संपूर्ण प्रकल्प दोन प्रमुख टप्प्यांत विभागला गेला आहे. यामध्ये पूर्व आणि पश्चिम अशा दोन स्वतंत्र भागांचे नियोजन आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा 65.45 किमी लांबीचा असून, दुसरा टप्पा 103.155 किमी लांबीचा असणार आहे. सध्या पश्चिम कॉरिडॉरच्या भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असून बांधकामाचा वेग वाढवण्यात आला आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर पुण्याच्या अंतर्गत रस्त्यांवरील जड वाहनांचा भार कमी होऊन पुणेकरांना मोकळा श्वास घेता येईल.


 

Topics mentioned in this article