Video : पुण्यातले रस्ते उंदीर, घुशींनी पोखरले? सिटी चौकातील घटनेमुळे पुणेकर धास्तावले!

पुण्यातील रस्ते आणि खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित करणारे संतोष पंडीत यांनी NDTV शी बोलताना याबाबत माहिती दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

पुण्यातील (Pune News) समाधान चौकातील सिटी पोस्ट भागात एक ट्रक खड्ड्यात कोसळल्याचा व्हिडिओ (Pune Truck Video) समोर आला आहे. ड्रेनेज लाइन स्वच्छ करण्यासाठी मलनिस्सारणाचा ट्रक बोलावण्यात आला होता. काम पूर्ण झाल्यानंतर बाहेर पडताना ही दुर्घटना घडली. खड्ड्याच्या खालच्या बाजूला भूमिगत मेट्रोचं कामही सुरू आहे. या घटनेनंतर अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. या रस्त्याला इतकं मोठं भगदाड कसं पडलं?, या खड्ड्यात पाणी कसं आलं?, या घटनेनंतर समोरील पोस्टाच्या शंभर वर्ष जुनी इमारतदेखील धोक्यात आहे का? यांसारखे अनेक सवाल उपस्थित होत आहे. 

पुण्यातील रस्ता पोखरल्यामुळे हे भलंमोठं भगदाड पडल्याची माहिती दिली जात आहे. पुण्यातील रस्ते आणि खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित करणारे संतोष पंडीत यांनी NDTV शी बोलताना याबाबत माहिती दिली. ते यावेळी म्हणाले, पुण्यातील रस्ते हे पोखरले गेले आहेत. घुशी आणि उंदरांनी पुण्यातील रस्ते पोखरले आहेत. महानगरपालिकेचं याकडे लक्ष नाही. पुण्यातील रस्ते खालून अक्षरश: कुजले आहेत.

त्यामुळे जुन्या वास्तुंची डागडुजी करायला हवी.  याशिवाय काही पुणेकरांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे घुशी आणि उंदरांची संख्या वाढली असून त्यांनी जमिनीखाली पोखरलं असल्याची माहिती दिली. त्यामुळे खरंच पुण्यातील रस्ते उंदीर आणि घुशींनी पोखरले आहेत का याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान याबाबत उत्तर देताना रस्ते वाहतूक तज्ज्ञ संजय शिरोडकर यांनी हा दावा नाकारला आहे. घुशी आणि उंदीर पोखरल्यामुळे इतकी मोठी घटना होऊ शकत नाही, अस शिरोडकर यांनी सांगितलं.