Pune News : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या अतिसंवेदनशील विषयावर गंभीर भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शालेय बस नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली.
काय केली कारवाई?
या कारवाईमध्ये एकूण 1,464 वाहनांची तपासणी करण्यात आली आणि त्यापैकी 249 वाहनांवर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात आली. या माध्यमातून 22 लाख 22 हजार रुपये इतका मोठा दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्हा शालेय बस सुरक्षितता समितीचे अध्यक्ष तथा पुणे शहर पोलीस आयुक्तांनी वेळोवेळी निर्देश दिले आहेत की, शाळा आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या शालेय बस चालकांनी नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे. त्यानुसार, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत संबंधित शाळा व्यवस्थापन आणि वाहन मालकांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच, 6 वर्षांखालील मुलांना ने-आण करण्याकरिता बसमध्ये महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आणि पोलीस विभागामार्फत वाहनचालक, वाहक, मदतनीस यांची चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक आहे.
( नक्की वाचा : 'पाकिस्तान जिंदाबाद' Video चा पर्दाफाश; चिमुरड्यांच्या घोषणांचं अकोला पोलिसांनी सांगितलं सत्य )
शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय क्रमांक संकिर्ण 1125/प्र.क्र. 241/25/ एसएम-1, दि. 16 एप्रिल 2025 नुसार सर्व शाळांमध्ये शालेय परिवहन समिती आणि विद्यार्थी सुरक्षा आणि भौतिक सुविधा विकसन समिती यांची स्थापना करण्याची दक्षता घ्यावी. या समित्यांनी शालेय बसवर कार्यरत असणाऱ्या वाहन चालकांची दरवर्षी नेत्र तपासणी झाली असल्याचे प्रमाणपत्र तपासणे महत्त्वाचे आहे. ज्या चालकांनी हे प्रमाणपत्र मिळवले नसेल, त्यांना शालेय विद्यार्थी वाहतुकीचे वाहन चालवण्यास दिले जाणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांवरील अनुचित प्रकार रोखण्याकरिता धोरण निश्चित करण्यासाठी 23 ऑगस्ट 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आलेल्या समितीनेही विद्यार्थी वाहतुकीबाबत काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी बस आणि इतर वाहने मुलांकरिता सुरक्षित राहतील याची खबरदारी घेणे शाळेसाठी आवश्यक आहे. प्रत्येक बस व इतर वाहनात सीसीटीव्ही असणे अनिवार्य आहे, तसेच मुली असणाऱ्या शाळांतील वाहनांमध्ये महिला कर्मचारी असणे बंधनकारक आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलीस विभाग यांच्यामार्फत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची संयुक्त तपासणी मोहीम यापुढेही राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत दोषी आढळणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच, शाळांनी शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षितपणे होईल याची विशेष खबरदारी घ्यावी आणि वाहनाची वैध कागदपत्रे नेहमी सोबत बाळगावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world