यशपाल सोनकांबळे, पुणे
पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना काही थांबताना दिसत नाहीत. धनकवडीतील गोळीबाराची घटना अजून ताजी असतानाच, आता सहकारनगर परिसरात भरचौकात गोळीबाराची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिंदे हायस्कूलजवळील गजबजलेल्या बिकानेर चौकात शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला. या प्राणघातक हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.
योगेश बनेकर असे या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, योगेश बनेकर हे बिकानेर चौकात असताना तळजाई परिसराच्या दिशेने एका दुचाकीवरून दोन अज्ञात संशयित आले. त्यांनी काही समजण्याच्या आत योगेश यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून वेगाने पळ काढला. गोळी लागल्याने योगेश बनेकर हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांचा घटनास्थळी धाव, सीसीटीव्ही तपासणी सुरू
गोळीबाराच्या आवाजाने बिकानेर चौक आणि सहकारनगर परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा पूर्ण केला आहे.
हल्लेखोर कोणत्या मार्गाने आले आणि कुठे पळून गेले, याचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू केली असून संशयितांना पकडण्यासाठी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.
गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट
हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की यामागे काही आर्थिक किंवा वैयक्तिक वाद होता, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world