अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune News: गेली सलग 28 वर्षे पुणेकरांना दिवाळीच्या पहाटे विनामूल्य संगीताची मेजवानी देणाऱ्या, तसेच शहराची सांस्कृतिक ओळख बनलेल्या सारसबाग येथील 'गोवर्धन पहाट दिवाळी' कार्यक्रमाची यंदाची परंपरा खंडित झाली आहे.
बुधवार, 22 ऑक्टोबर रोजी होणारा हा भव्य कार्यक्रम आयोजकांनी काही 'अपरिहार्य कारणांमुळे' आणि समाजमाध्यमांवरील आक्षेपामुळे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी कार्यक्रमाची रीतसर परवानगी घेऊन जय्यत तयारी झाली असतानाही, आयोजक युवराज शहा, जितेंद्र भूरूक आणि सह-संयोजकांनी माघार घेतली आहे.
काय आहे कारण?
गेली 28 वर्षे आजपर्यंत कुठलीही अप्रिय घटना न घडता हा विनामूल्य कार्यक्रम हजारो पुणेकरांसाठी सर्वात लोकप्रिय ठरला होता. मात्र, सध्या समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये या कार्यक्रमावर आक्षेप घेण्यात आला असून, केवळ आक्षेपच नव्हे, तर 'तेथे जर कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर उलट पोलिसांना जबाबदार धरले जाईल', असा जाहीर इशाराही दिला जात असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. हा इशारा पाहता, ऐन दिवाळीच्या काळात पोलीस आपले घर सोडून अहोरात्र मेहनत करत असताना त्यांनाच वेठीस धरणे आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका आयोजकांनी घेतली आहे.
( नक्की वाचा : Pune News : पुण्याच्या मॉर्डन कॉलेजमुळे मराठी तरुणानं लंडनमधील नोकरी गमावली? प्राचार्यांनी दिलं उत्तर )
ताणतणावांनी ग्रासलेल्या जनसामान्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी गेली २८ वर्षे हा उपक्रम सुरू होता, परंतू 'समाजकंटकांमार्फत काही अप्रिय घटना घडवून शांतताभंग होऊ नये' आणि 'आजवरच्या आनंदी सांगीतिक परंपरेला नाहक गालबोट लागू नये' यासाठी, तसेच 'काही घडल्यास त्याचे खापर विनाकारण संयोजकांवर फोडले जाऊ नये' या स्पष्ट कारणांमुळे आयोजकांनी स्वतःहून माघार घेतली आहे. काही उपद्रवी प्रवृत्तींमूळे हजारो रसिकांना ही पर्वणी सोडावी लागत आहे, याची खंत व्यक्त करत रसिकांनी याची नोंद घ्यावी, अशी विनंती आयोजकांनी पत्रकाद्वारे केली आहे.