
Pune News : पुण्यातील प्रतिष्ठित मॉडर्न आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेज एका गंभीर वादात सापडले आहे. माजी विद्यार्थी प्रेम बिऱ्हाडे याने शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी (Verification) न केल्यामुळे त्याला लंडनमधील हीथ्रो एअरपोर्टवरील मोठी नोकरी गमवावी लागल्याचा खळबळजनक दावा केला आहे. कॉलेज प्रशासनाने जातीय भेदभाव केल्यामुळे हे घडल्याचा बिऱ्हाडेचा आरोप आहे. या प्रकरणात प्रकाश आंबेडकरांनी थेट उडी घेत कॉलेजच्या प्राचार्या डॉ. निवेदिता जी. एकबोटे यांच्यावर 'जातीय पूर्वग्रह' आणि 'मनुवादी' विचारधारेचा आरोप केला. यावर प्राचार्यांनी 'हा बदनामीचा प्रयत्न' असल्याचे सांगत, कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत उत्तर दिले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
पुण्यातल्या शिवाजीनगर भागातील मॉडर्न आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेजयेथील माजी विद्यार्थी प्रेम बिऱ्हाडे (Prem Birhade) याने महाविद्यालयाच्या प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. प्रेमने सोशल मीडियावर दावा केला की, ब्रिटनमधील एका कंपनीतील नोकरीसाठी त्याला शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी (Verification/Education Reference) आवश्यक होती, परंतु कॉलेज प्रशासनाने 'जातीय भेदभाव' करून ही पडताळणी करण्यास टाळाटाळ केली. यामुळे त्याला ती 'हार्ड-अर्न' नोकरी गमवावी लागली. प्रेम बिऱ्हाडे हा दलित समाजातील असून, त्याचा संघर्षमय प्रवास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुण्यात सर्वात मोठी दहशतवादविरोधी कारवाई; कोथरूडच्या एका साध्या चोरीने दहशतवादी जाळे कसे उघड केले? )
प्रकाश आंबेडकरांचे गंभीर आरोप
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी या प्रकरणात थेट उडी घेत कॉलेज प्रशासन आणि प्राचार्यांवर गंभीर आरोप केले. त्यांनी 'X' (ट्विटर) वर लिहिले की, प्रेम बिऱ्हाडे या दलित विद्यार्थ्याला केवळ त्याच्या 'दलित' असल्यामुळे कॉलेजने व्हेरिफिकेशन देण्यास नकार दिला, ज्यामुळे त्याला लंडनमधील हीथ्रो एअरपोर्टवरील नोकरी गमवावी लागली.
आंबेडकर यांनी पुढे म्हटले की, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निवेदिता जी. एकबोटे (Dr. Nivedita G. Ekbote) या भाजयुमो (भाजप युवा मोर्चा) च्या महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजकीय आणि मनुवादी विचारधारेमुळे, SC, ST, OBC विद्यार्थ्यांविरोधात जातीय पूर्वग्रहदूषित वर्तन केले जात आहे. पूर्वी लंडनला शिक्षण घेण्यासाठी जाताना हेच व्हेरिफिकेशन कॉलेजने दिले होते, परंतु नोकरीसाठी मागणी केल्यावर त्याची जात विचारण्यात आली, असा गंभीर आरोपही आंबेडकर यांनी केला.
Prem Birhade, a young Dalit who recently graduated from the prestigious University of Sussex, was forced to forfeit a hard-earned employment opportunity at Heathrow Airport in London.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) October 16, 2025
The reason? His former college, Modern College of Arts, Science and Commerce in Pune, refused… pic.twitter.com/vYi5wi8j98
कॉलेज प्रशासनानं दिलं उत्तर
या सर्व आरोपांवर मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्या डॉ. निवेदिता जी. एकबोटे यांनी एक सविस्तर पत्रक काढून आपली बाजू स्पष्ट केली आहे. त्यांनी विद्यार्थ्याचे सर्व आरोप 'खोटे' असल्याचे सांगून, हा महाविद्यालयाची आणि प्राचार्यांची 'बदनामी' करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले आहे.
प्राचार्यांच्या स्पष्टीकरणातील प्रमुख मुद्दे:
जातीय भेदाभेद नाही: महाविद्यालयात कधीही जातीवर आधारित भेदभाव झालेला नाही. संस्था समानता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर कार्यरत आहे.
संदर्भपत्र नाकारण्याचे कारण: या विद्यार्थ्याला यापूर्वी तीन वेळा Letter of Recommendation (LOR) आणि बोनाफाईड प्रमाणपत्र देण्यात आले आहे. अलीकडे Education Reference नाकारण्याचा निर्णय त्याच्या महाविद्यालयीन काळातील 'शिस्त आणि वर्तन समाधानकारक नसल्यामुळे' आणि संस्थेच्या धोरणानुसार घेण्यात आला आहे.
(नक्की वाचा : Pune News: पुण्यातील उच्चशिक्षित IT इंजिनियर, बँक कर्मचारी दहशतवादी गटात सहभागी! ATS नं उधळला मोठा कट )
प्रोफेशनल निर्णय: संदर्भपत्र न देण्याचा निर्णय केवळ संस्थेचे धोरण आणि व्यावसायिक प्रामाणिकतेवर आधारित आहे, त्याचा विद्यार्थ्याच्या सामाजिक किंवा जातीय पार्श्वभूमीशी कोणताही संबंध नाही.
सायबर छळाचा आरोप: हा विद्यार्थी सोशल मीडियाचा गैरवापर करत खोटी, दिशाभूल करणारी आणि चिथावणीखोर माहिती प्रसारित करून 'सायबर छळ' करत आहे.
कायदेशीर कारवाईची मागणी: प्राचार्यांनी भारतीय दंड संहिता (IPC) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) नुसार विद्यार्थ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर: प्राचार्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांप्रती आदर व्यक्त केला.
वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांनंतर वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी संघटनेने मॉडर्न कॉलेजसमोर तीव्र आंदोलन केले. त्यांनी 'प्रेम बिऱ्हाडे याला न्याय मिळावा' आणि प्रशासनाच्या 'अन्यायकारक वर्तना'चा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world