पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या आणि दिवाळी सणानिमित्त नागरिकांची गर्दी लक्षात घेता, पुणे शहर वाहतूक पोलिसांनी भिडे पुलावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा दिलासा केवळ दिवसापुरता मर्यादित असणार असून, रात्री 10.00 वाजल्यानंतर पुलावरील वाहतुकीला पुढील आदेशापर्यंत मनाई कायम ठेवण्यात आली आहे.
नक्की वाचा: जिल्हा परिषद आरक्षण सोडतीची तारीख जाहीर
भिडे पुलावरून वाहतुकीला बंदी का घातली होती ?
महामेट्रोच्या वतीने डेक्कन मेट्रो स्टेशनला जोडणारा पादचारी केबल ब्रिज तयार करण्याचे काम सुरू असल्यामुळे भिडे पुलावरील वाहतूक यापूर्वी बंद करण्यात आली होती. सध्या दिवाळीचा सण असल्यामुळे पुण्याच्या मध्यवर्ती भागातील विश्रामबाग आणि डेक्कन परिसरात नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. ही गर्दी आणि संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, तसेच वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होणेकरीता वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला आहे.
नक्की वाचा: बांधकाम साहित्याच्या धोकादायक लोडिंगमुळे पुण्यात शालेय बसला भीषण अपघात
रात्री 10 नंतर भिडे पुलावरून वाहतुकीस मनाई
पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर, अमोल झेंडे यांनी मोटार वाहन कायद्यातील प्राप्त अधिकारांचा वापर करून यासंदर्भात आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार, भिडे पुलावरील वाहतूक दिनांक 11 ऑक्टोबर 2025 पासून दररोज सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सुरू करण्यात येत आहे. याचाच अर्थ, रात्री 10.00 वाजल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा बंद होईल. पुलावरून दिवसभर वाहतूक सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असला तरी, रात्रीच्या वेळेस काम आणि सुरक्षितता या कारणांमुळे पुलावरून जाण्यास मनाई असेल. वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात विश्रामबाग आणि डेक्कन वाहतूक विभागांना तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. पुलावरील वाहतुकीचे हे नवे वेळापत्रम पुढील आदेशापर्यंत लागू राहील.