जाहिरात

Pune News: पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल, लक्ष्मी रोडसह 5 मुख्य रस्ते बंद, वाचा सर्व पर्यायी मार्ग

Pune Shiv Jayanti Traffic Diversions : गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून मिरवणुका संपेपर्यंत मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

Pune News: पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल, लक्ष्मी रोडसह 5 मुख्य रस्ते बंद, वाचा सर्व पर्यायी मार्ग
Pune Shiv Jayanti Traffic Diversions : पुणे शहरातील वाहतुकीमध्ये शिवजयंतीनिमित्तानं बदल करण्यात आला आहे.
पुणे:

Pune Shiv Jayanti Traffic Diversions 2026: पुणे शहरात शिवजयंतीचा उत्साह मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत असून 19 फेब्रुवारी रोजी शहराच्या मध्यवर्ती भागात शिवजन्मोत्सवाच्या भव्य मिरवणुका निघणार आहेत. या निमित्ताने होणारी नागरिकांची गर्दी आणि मिरवणुकांचा मार्ग लक्षात घेऊन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून मिरवणुका संपेपर्यंत मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पुण्यातील वाहतूक बदलांचे सविस्तर नियोजन

 लक्ष्मी रोड, शिवाजी रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड आणि केळकर रोड या पुणे शहरातील मुख्य रस्त्यांवर शिवजयंतीनिमित्त मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी सकाळी 7 पासूनच आवश्यकतेनुसार वाहतूक वळवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी प्रवास करताना नियोजित वेळेच्या आधी निघावे आणि शक्य असल्यास या भागातील प्रवास टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे.

( नक्की वाचा : Shiv Jayanti 2026 : शिवजयंती वर्षातून दोनदा का साजरी होते? तुम्हाला माहिती आहे का खरे कारण? )
 

शिवाजी रस्ता आणि गणेश रस्त्यावरील बदल

जिजामाता चौकातून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना आता थेट जाता येणार नाही. या वाहनांनी स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक आणि पुढे टिळक रस्ता या मार्गाचा वापर करून आपल्या इच्छित स्थळी पोहोचावे. तसेच गणेश रस्त्याने फडके हौद चौक आणि जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक दारूवाला पूल चौकातून इतर पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली आहे.

केळकर आणि लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक

केळकर रस्त्यावरून अप्पा बळवंत चौकामार्गे जोगेश्वरी मंदिर चौक आणि बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक गरजेनुसार वळवली जाईल. लक्ष्मी रस्त्यावर मिरवणूक सुरू असताना सोन्या मारुती चौकापर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी मर्यादित असेल. अशा वेळी लक्ष्मी रस्त्यावरील वाहने संत कबीर चौक म्हणजेच समर्थ विभाग मार्गे वळवण्यात येतील, जेणेकरून मिरवणुकीत कोणताही अडथळा येणार नाही.

( नक्की वाचा : Pune News : पुणेकरांनो सुटका झाली, हिंजवडी मेट्रो धावली! 23 किलोमीटर प्रवासातील सर्व स्टेशन्स कोणती? पहा VIDEO )

पुरम चौक आणि बाजीराव रस्त्यावरील नियोजन

पुरम चौकातून बाजीराव रस्त्यामार्गे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पुरम चौक, टिळक रस्ता, अलका टॉकीज चौक आणि एफ. सी. रस्ता या मार्गाचा अवलंब करावा. मिरवणूक सुरू झाल्यावर अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी आणि बाजीराव रस्त्याने फुटक्या बुरुजाकडे जाणारी वाहतूक केळकर रस्त्यावरून सरळ पुढे पाठवण्यात येईल. तसेच स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनाकडे जाणाऱ्या वाहनांनी जंगली महाराज रस्ता आणि झाशी राणी चौक या मार्गाचा वापर करावा.

शनिवारवाडा आणि महापालिका परिसरातील बदल

मिरवणुका गाडगीळ पुतळा परिसर पार करेपर्यंत सर्व वाहने सावरकर भवन पूल आणि बालगंधर्व मार्गे पाठवली जातील. शनिवारवाड्याकडे जाणारी वाहतूक कॉसमॉस बँक जंक्शन, बालगंधर्व आणि टिळक पूलमार्गे वळवण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून मिरवणूक काळात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com