
Pune Train Fire : पुणे शहरात जवळपासच्या भागातून रोज कामसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या सर्वांसाठी शटल ट्रेन हा मोठा आधार आहे. रोज हजारो नागरिक या शटल ट्रेननं पुण्यात ये-जा करत होते. या सर्व प्रवाशांसाठी एक धक्कादायक घटना सोमवारी सकाळी (16 जून ) घडली. दौंडहून पुण्याच्या दिशेने धावणाऱ्या शटल डेमू ट्रेनला आग लागली होती. दौंडहून सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी सुटलेल्या या रेल्वेत आग लागली होती. ही आग का लागली यावर मध्य रेल्वेनं स्पष्टीकरण दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मध्य रेल्वेनं काय सांगितलं?
दौंडहून पुण्याच्या दिशेने धावणाऱ्या शटल डेमू ट्रेनमध्ये आग शॉर्ट सर्किटमुळे लागली नव्हती, असं मध्य रेल्वेनं याबाबतच्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. याबाबत मध्य रेल्वेनं दिलेल्या स्पष्टीकरणात म्हंटलं आहे की,
16 जून २०२५ रोजी, दौंड-पुणे डीईएमयू (ट्रेन क्रमांक ७१४०४) मधील कोच क्रमांक CR १७८३७८ मध्ये यवतजवळ धूर झाल्याचे निदर्शनास आले. एका व्यक्तीने (भिकाऱ्यासारखा दिसणारा) शौचालयाच्या आत कागद/बिडी पेटवल्यामुळे हा प्रकार घडला. त्याने आतून शौचालय बंद करून घेतले होते आणि ते उघडले नाही. कोणतीही शॉर्ट सर्किट झाले नाही. पॉईंट्समन आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी खिडकी तोडून त्या व्यक्तीला बाहेर काढले आणि आरपीएफच्या ताब्यात दिले. सुरक्षितता तपासणीनंतर ट्रेन पुन्हा सुरू झाली. या घटनेत दोषी व्यक्तीला किंवा कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.
( नक्की वाचा : Pune Crime News: इंदापूरचे बेपत्ता पोलीस हवालदार अखेर सापडले! एका फोनमुळे लागला छडा )
तपासादरम्यान असे आढळून आले की, दोषी प्रवाशाने शौचालयाच्या आत कागद जाळला होता, ज्यामुळे धूर पसरला. ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे आढळले असून, तिला ताब्यात घेण्यात आले आहे. राज्य पोलीस पुढील तपास करत आहेत.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या त्वरित कारवाईचे पुणे विभाग कौतुक करतो आणि सर्वांसाठी सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे.'
दरम्यान, या आगीनंतर प्रवाशांमध्ये भीतीच वातावरण पसरलं होते. ज्या डब्यात ही आग लागली, तेथील प्रवाशी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करत होते. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world