Pune News: पुण्यात पाण्याचे संकट! जिल्हाधिकाऱ्यांचे पाणी नियोजनाचे कडक आदेश

Pune News: पुणे जिल्ह्यात संभाव्य पिण्याच्या पाण्याची टंचाई टाळण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्याचे कठोर निर्देश दिले आहेत. दुसरीकडे, पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे टँकरच्या मागणीत मोठी वाढ झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News: पुणे शहर आणि जिल्ह्यात आगामी काळात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच कंबर कसली आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील पाणीपुरवठा परिस्थितीचा सविस्तर आढावा घेत सर्व संबंधित विभागांना उपलब्ध पाण्याचे अत्यंत काटेकोर नियोजन करण्याचे कडक आदेश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. 

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील उपलब्ध पाणीसाठा 

  • खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरण समूह: एकूण 4.13 टीएमसी.
  • पवना धरण (पिंपरी-चिंचवड व मावळ परिसर): 1.65 टीएमसी 

या उपलब्ध साठ्यातून पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी पुरवावे लागणार असल्याने पाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Advertisement

(नक्की वाचा-  Pune-Shirdi Railway: साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-शिर्डी पहिली थेट रेल्वे सेवा 17 जूनपासून सुरू)

टँकर दरात मोठी वाढ

जिल्ह्यात एकीकडे नियोजनाचे आदेश सुटले असताना, पुणे शहरात मात्र पाणी कपातीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने खाजगी टँकरच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. याचाच गैरफायदा घेत खाजगी टँकर चालकांनी इंधनदरवाढीचे कारण पुढे करत टँकरच्या दरांमध्ये मोठी वाढ केली आहे. 

या अवाजवी वाढीव दरांमुळे टंचाईग्रस्त भागातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत असून त्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. तसेच, शहरातील काही भागांमध्ये अद्यापही पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.

(नक्की वाचा-  School Time: राज्यातील शाळांची वेळ बदलणार? ॲक्टिव्ह टीचर्स फोरमने शिक्षणमंत्र्यांकडे काय केली मागणी?)

सवलतीच्या दरात पाणी देण्याची मागणी

पाणी कपातीच्या या कठीण काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी आता राजकीय पक्षही आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि भाजपच्या नगरसेवकांनी एकत्र येत पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला एक अधिकृत पत्र पाठवले आहे. वडगाव खुर्द टँकर पॉईंटवरून टँकरधारकांना सवलतीच्या दरात पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी यात करण्यात आली आहे. टँकर चालकांना पालिकेकडून कमी दरात पाणी मिळाल्यास, ते नागरिकांकडून जादा दर उकळणार नाहीत आणि टंचाईग्रस्त भागातील जनतेला स्वस्त पाणी मिळेल. पाणी कपातीच्या काळात प्रशासनाने केवळ बैठका न घेता नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा देण्यासाठी तातडीच्या आणि ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे.
 

Topics mentioned in this article