पुण्यात झिका व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी (1 जुलै) रोजी पुण्यात झिका व्हायरसच्या आणखी दोन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या 6 झाली आहे. नवीन रुग्णांमध्ये एरंडवणे येथे राहणाऱ्या दोन गर्भवती महिलांचा समावेश आहे. शनिवारी देखील एरंडवणे येथे एक गर्भवती महिला आणि मुंढवा येथील 22 वर्षीय तरुणाला झिका व्हायरसची लागण झाली होती.
पुण्यात झिकाची पहिले रुग्ण ज्या परिसरात आढळले होते तिथेच दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या परिसरात तपासणी सुरु केली असून या भागातून सॅम्पल्स गोळा केले जात आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बलिवंत यांनी सांगितले की, गोळा केलेल्या 25 सॅम्पल्सपैकी 12 एरंडवणे येथील असून त्यात सात गरोदर महिलांचा समावेश आहे. यापैकी दोन गर्भवती महिलांमध्ये झिका पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. मुंढवा येथून अतिरिक्त 13 सॅम्पल्स गोळा करण्यात आले.
(नक्की वाचा- पुण्यातील या पर्यटनस्थळांवर संध्याकाळी 6 वाजेनंतर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश)
झिकाची लागण झालेल्या गर्भवती महिलांना जास्त धोका असल्याचे मानले जाते. त्यामुळे आरोग्य विभागाने दोन्ही प्रभावित भागात प्रामुख्याने लक्ष ठेवलं आहे. पुण्यातील झिका व्हायरसचा प्रसार चिंतेचा विषय असून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि पुढील संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
बाधित भागातील रहिवाशांना डासांपासून संरक्षण करण्याचे आणि झिका व्हायरसची कोणतीही लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ला घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. झिका व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पुणे महापालिकेने नागरिकांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
(नक्की वाचा- दोन दिवसांच्या मुक्कामानंतर तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ)
झिका व्हायरसची लक्षणे ?
- एडिस एजिप्ती नावाच्या डासामुळे झिका व्हायरसचा संसर्ग होतो.
- झिका व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर या आजाराची लक्षणे तीन -14 मध्ये निदर्शनास येतात.
- झिका व्हायरसची लागण झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत.
- ताप येणे, त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यांतील बुबुळाच्या पुढील भागामध्ये जळजळ होणे, स्नायूदुखी, सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी यासारखी लक्षणे आढळतात.