Pune News: पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. लहान मुलांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनांमुळे आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर या तालुक्यांमधील शालेय विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे.
शाळेच्या वेळेत बदल
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या चार तालुक्यांतील 233 गावे 'बिबट्याप्रवण क्षेत्र' म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या गावांतील शाळा आता पूर्वीच्या वेळेऐवजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 4.30 या वेळेत भरवल्या जाणार आहेत. यापूर्वी शाळेची वेळ ही सकाळी 10.30 ते संध्याकाळी 5 अशी होती. शाळा लवकर भरवण्याची ही सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) गजानन पाटील यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना केली आहे.
(नक्की वाचा- Holiday in Maharashtra: महाराष्ट्रात 2 डिसेंबरला पगारी सुट्टी; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय)
निर्णयामागचे कारण
बिबट्यांचा वावर प्रामुख्याने सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेत जास्त असतो. विद्यार्थ्यांचे शाळेत येणे-जाणे सुरक्षित व्हावे आणि बिबट्याच्या हल्ल्याचा धोका कमी व्हावा, हा या वेळ बदलामागील मुख्य उद्देश आहे. सायंकाळी साडेचार नंतर विद्यार्थी घरी परतल्यास त्यांना अंधार होण्यापूर्वी सुरक्षितपणे घरी पोहोचता येईल.
याआधी ज्या गावांमध्ये बिबट्या दिसला किंवा हल्ल्याच्या घटना समोर आल्या, त्या गावांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. यापुढेही जिथे बिबट्याचा वावर आढळेल अशा ठिकाणी वेळेत बदल केले जाणार आहेत. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू आहे.
(नक्की वाचा- नियमभंग, असभ्य वर्तन, सामान अडवलं… पुण्यात रात्रीच्या वेळी लेखिकेला Uber चालकाचा भयानक अनुभव)
वनपरिक्षेत्रनिहाय गावांची संख्या
- जुन्नर - 27
- ओतूर -36
- शिरूर - 72
- मंचर - 22
- घोडेगाव - 27
- खेड - 21
- चाकण - 28