Pune News: पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाचे दर फायनल! तुमच्या जमिनीचा आणि झाडांचा किती मिळणार भाव? वाचा सविस्तर

Purandar Airport Land Acquisition Rates Finalized: पुरंदरमधील गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाने आता निर्णायक वळण घेतले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Purandar Airport : विशेष म्हणजे ही सर्व रक्कम आयकर किंवा इतर कोणत्याही शासकीय करातून मुक्त असेल. (प्रतिकात्मक फोटो)
पुणे:

Purandar Airport Land Acquisition Rates Finalized: पुरंदरमधील गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाने आता निर्णायक वळण घेतले आहे. जमिनीच्या बदल्यात ,शेतकऱ्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जर तुम्ही या प्रकल्पात जमीन गमावत असाल, तर सरकारने तुमच्यासाठी नेमकी काय शिदोरी उघडली आहे, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

एका एकराला किती मिळणार रक्कम?

विमानतळासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मोबदला निश्चित केला आहे. उच्चाधिकार समितीने दिलेल्या मंजुरीनुसार, प्रति हेक्टरी सुमारे 3 कोटी 79 लाख रुपये दिले जाणार आहेत. हेच गणित जर आपण एकरामध्ये मोजले, तर व्याजासह एका एकराला सुमारे 1 कोटी 61 लाख 1 हजार 925 रुपये इतकी मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडणार आहे. 

Advertisement

विशेष म्हणजे ही सर्व रक्कम आयकर किंवा इतर कोणत्याही शासकीय करातून मुक्त असेल आणि थेट आर.टी.जी.एस. द्वारे बँक खात्यात जमा केली जाईल.


( नक्की वाचा : Pune News: कॅब चालकाच्या सतर्कतेमुळे अमेरिकन नागरिकांचा डाव फसला; पुणे पोलिसांची मोठी कारवाई, प्रकरण काय? )

फक्त जमीनच नाही, तर झाडांचेही मूल्य दुप्पट

या प्रकल्पासाठी पुरंदरमधील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी आणि खानवडी या 7 गावांमधील एकूण 1216.75 हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. येथे केवळ जमिनीलाच भाव दिला जात नाही, तर जमिनीवर असलेले घर, गोठा, विहीर आणि फळझाडांचेही मूल्यांकन करण्यात आले आहे. 

संबंधित विभागाने निश्चित केलेल्या मूल्यांकनाच्या दुप्पट रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये घरांच्या प्रकारानुसार 3 लाख ते 40 लाख रुपयांपर्यंतचा मोबदला मिळू शकतो. तसेच आंबा, सीताफळ, नारळ यांसारख्या झाडांना त्यांच्या उंची आणि वयानुसार भरघोस दर देण्यात आले आहेत.

( नक्की वाचा : Mumbai Local : मुंबई लोकलच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतंय असं काही! नव्या ट्रेनची यूपीत टेस्ट, काय आहे कारण? )

संमतीने जमीन देणाऱ्यांसाठी विशेष पॅकेज

जे शेतकरी स्वतःहून या प्रक्रियेत सहभागी होतील, त्यांच्यासाठी पुनर्वसनाचे विशेष पर्याय खुले आहेत. जमिनीच्या बदल्यात 10% विकसित भूखंडाचा परतावा घेण्याचा पर्यायही शासनाने दिला आहे. याशिवाय भूमिहीन होणाऱ्यांना 750 दिवसांची मजुरी आणि अल्पभूधारकांना 500 दिवसांची मजुरी अतिरिक्त मिळणार आहे. आपले घर किंवा गोठा दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी अनुक्रमे 40 हजार आणि 20 हजार रुपयांची मदतही दिली जाणार आहे.

Advertisement

प्रशासनाचे आवाहन आणि महत्त्वाची मुदत

भूसंपादनाची ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने 6 मे 2026 ते 10 जून 2026 ही मुदत निश्चित केली आहे. या काळात शेतकऱ्यांनी आपली संमतीपत्रे सादर करणे आवश्यक आहे. आतापर्यंत 7 गावांतील 244 खातेदारांनी 436.61 एकर जमिनीसाठी संमती दर्शवली आहे. जर या मुदतीत संमती दिली नाही, तर सक्तीने भूसंपादन केले जाईल. मात्र, अशा स्थितीत शेतकऱ्यांना सवलती आणि पुनर्वसनाचे अतिरिक्त लाभ गमवावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मालकी हक्काबाबत हरकतीसाठी वेळ

ज्या जमिनींवर काही न्यायालयीन वाद आहेत किंवा तिसऱ्या व्यक्तीचा अधिकार आहे, त्यांनी आपली हरकत नोंदवण्यासाठी केवळ 7 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. विमानतळ प्रकल्पामुळे केवळ पुरंदरचाच नव्हे, तर संपूर्ण राज्याच्या विकासाला गती मिळणार असल्याने या भूसंपादन प्रक्रियेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांनी आपला मोबदला आणि हक्क समजून घेऊन 10 जून 2026 पर्यंत त्यांचा निर्णय कळवणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article