- पुरंदर तालुक्यातील मांडकी येथून तब्बल 28 लाख रुपयांहून अधिक किमतीचा चंदन साठा जप्त करण्यात आला आहे
- दहशतवाद विरोधी पक्षक आणि जेजुरी पोलीस यांनी संयुक्तपणे चंदन तस्करीविरोधात विशेष छापा टाकला होता
- आरोपी प्रतिक प्रमोद खुंटे याच्याकडून 560 किलो वजनाचे चंदनाचे ओंडके आणि कटर, ड्रिल जप्त केले गेले
देवा राखुंडे
एका मोठ्या कारवाई मुळे पुरंदर आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई दहशतवाद विरोधी पक्षक आणि जेजुरी पोलीस यांनी संयुक्त पणे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुरंदर तालुक्यात चंदनाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत होती. या विरोधातच ही कारवाई करण्यात आली आहे. मांडकी येथून तब्बल 28 लाख रुपयांहून अधिक किमतीचा चंदनसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. चंदन तस्करीच्या साखळीचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. या कारवाईमुळे चंदन तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुरंदर तालुक्यातील मांडकी गावातील प्रतिक प्रमोद खुंटे याच्याविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीविरुद्ध महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियमसह वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 मे 2026 रोजी दुपारी आडीच वाजता छापा टाकण्यात आला. मांडकी येथील पाटीलवस्ती परिसरातील विलास भोसले यांच्या शेतामध्ये विशेष पथकाने ही कारवाई केली. या कारवाई दरम्यान आरोपी प्रतिक खुंटे याच्याकडे अनधिकृतरीत्या साठवून ठेवलेले 560 किलो वजनाचे चंदनाचे ओंडके आढळून आले. या चंदनची अंदाजे किंमत तब्बल 28 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय लाकूड कापण्यासाठी वापरण्यात येणारा बॅटरीवर चालणारा कटर आणि दोन लोखंडी ड्रिलदेखील जप्त करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पुरंदर तालुक्यात चंदन चोरी आणि तस्करीच्या घटना वाढत असल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले होते. या पार्श्वभूमीवर विशेष पथक तयार करून संशयितांवर गुप्त पाळत ठेवण्यात येत होती. अखेर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेत मोठा साठा हस्तगत केला. या कारवाईमुळे चंदन तस्करीच्या रॅकेटला मोठा धक्का बसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
ही कारवाई करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथक(ATS)चे सहाय्यक फौजदार महेश गायकवाड,विशाल गव्हाणे,हेड कॉन्स्टेबल निलेश कदम, रवींद्र जाधव,पोलिस कॉन्स्टेबल मोसीन शेख, ओंकार शिंदे, केशव जगताप यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार भोंगळे करत आहेत. आरोपीकडून आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पुरंदर तालुक्यातील वनसंपदा सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने अधिक कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होताना दिसत आहे.