Rain News: राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात मंत्र्यांची गर्दी, काय आदेश दिले?

आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना योग्य वेळी सतर्कतेचे संदेश पाठवावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यानुसार राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला. महाजन यांनी मुंबई शहर आणि परिसरासह राज्यातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी संपर्क साधून मुंबईतील माहिती जाणून घेतली. नांदेड व रायगड जिल्ह्यातील परिस्थितीविषयी संबधित जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून शासकीय यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.

पावसामुळे उद्भवू शकणाऱ्या आपत्तीजन्य परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविणे, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविणे, तातडीने मदत व बचाव कार्य यासंबंधी यंत्रणांनी कार्यक्षमतेने काम करावे, अशा  सूचना आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाजन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना योग्य वेळी सतर्कतेचे संदेश पाठवावेत, नद्यांच्या पाणी पातळीवर सतत लक्ष ठेवून आवश्यक ते निर्णय घ्यावेत, तसेच स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून आपत्तीग्रस्त भागात तात्काळ मदत पोहोचवावी, असे निर्देशही या वेळी देण्यात आले. मदत, पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अपर मुख्य सचिव  सोनिया सेठी आणि  राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी  राज्यात सुरू  असलेल्या अतिवृष्टी संदर्भात आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना माहिती दिली.

नक्की वाचा - Dombivali Rain: पावसाचा दणका! खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यात कंबरेपर्यंत पाणी

दरम्यान गेले तीन दिवस मुंबई परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळित होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाचा वाढता जोर पाहता, आपत्ती विभागाने सज्ज राहावे असे निर्देश त्यांनी या यावेळी विभागाला दिले. लोढा यावेळी म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस राज्यातल्या स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या ते संपर्कात असून मुंबईत ही त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्कतेचा सूचना दिल्या आहेत.त्यांच्या मार्गदर्शनात मंत्रिमंडळातील सर्व सहकारी राज्यातल्या विविध भागात जनजीवन सुरळीत करण्यासाठी कार्यरत  आहेत.

नक्की वाचा - Rain Alert: मुंबईसह राज्यात येत्या 24 तासात पावसाची स्थिती कशी असेल? हवामान विभागाचा अंदाज समोर

मुंबईत सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे सह पालकमंत्री  लोढा यांनी आज मुंबई महापालिका मुख्यालयातील आपात्कालीन व्यवस्थापनाचा आढावा घेतला. यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासोबतही त्यांनी चर्चा केली. तसेच व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांकडून मुंबईतील सद्य  स्थितीबाबत माहिती घेतली. मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी सखल भाग आहेत, त्याठिकाणी पाणी साचून वाहतूक व्यवस्था कोलमडते. त्याठिकाणी तात्काळ पंप लावून पाण्याचा निचरा लवकरात लवकर करून जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न करावा. तसेच कुर्ला, घाटकोपर, चेंबूर या भागात काही वस्त्या टेकड्यांवर वसलेल्या आहेत. त्या ठिकाणी अधिक सतर्क राहून व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी अशा सूचना यावेळी लोढा यांनी दिल्या. 

Advertisement