Raj Thackeray: शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत आज युतीचा घोषणा केली. राज ठाकरे यांनी "आम्ही एकत्र आलो आहोत" असं म्हणत युतीची घोषणा केली. राज आणि उद्धव यांची युती आगामी महापालिकाच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे. राज आणि उद्धव यांच्या एकत्र आल्याने राज्यातील राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहेत.
काय म्हणाले राज ठाकरे?
कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे," या एका वाक्याने ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची पायाभरणी झाली होती. त्याची वाक्याची आठवण राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा करुन दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, "मी आधीच म्हटलं होतं की कुठल्याही भांडणापेक्षा, वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तेव्हापासूनच या युतीची सुरुवात झाली होती. आज आम्ही अधिकृतपणे सांगतोय की, मनसे आणि शिवसेना एकत्र लढणार आहोत. जे महाराष्ट्रप्रेमी आहेत, ते युतीमध्ये येऊ शकतात. ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे. "
राज्यात मुलं पळवणाऱ्या टोळ्या
राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रहार करताना म्हटले, "लहान मुलं पळवणाऱ्या खूप टोळ्या महाराष्ट्रात फिरतायत, त्यात दोन आणखी टोळ्या अॅड झाल्यात जी राजकीय पक्षातील मुलं पळवतात. जे निवडणुका लढवणार आहे, त्या उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जात आहे."
मुंबईचा महापौर मराठीच
"मुंबईवर कुणाचीही हुकूमत चालणार नाही. मुंबईचा आगामी महापौर मराठीच असेल आणि तो आमच्या युतीचाच असेल," असा ठाम विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.तसेच कोण किती जागा लढवणार हे आम्ही आताच जाहीर करणार नाही, कारण सध्या उमेदवार पळवण्याचे काम सुरू आहे. योग्य वेळी आम्ही ही माहिती देऊ," असे सांगत राज ठाकरे यांनी जागावाटपाचा सस्पेन्स कायम ठेवला.
या ऐतिहासिक युतीमुळे केवळ मुंबईच नाही, तर ठाणे, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या महानगरपालिकांमधील राजकारणाची गणिते पूर्णपणे बदलणार आहेत.