Pradeep Sharma Exclusive: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जीवाला मोठा धोका होता, मात्र मुंबई पोलिसांना मिळालेल्या एका गोपनीय माहितीमुळे त्यांचा जीव वाचला, असा मोठा आणि थरारक गौप्यस्फोट एन्काऊन्टर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केला आहे. 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला. एवढेच नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांना ठार मारण्यासाठी आलेल्या अतिरेक्यांचा आपण कसा एन्काऊन्टर केला, याबद्दलही शर्मा यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
काय होतं प्रकरण?
प्रदीप शर्मा यांनी NDTV मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, आम्ही 10-12 नंबर इंटरसेप्ट करत होतो. त्यावर पाळत ठेवून होता. त्यामध्ये अचानक राज ठाकरेंच्या नावाचा उल्लेख होऊ लागला. त्यांच्या जीवाला धोका आहे, अशी माहिती त्यामधून समजली. राज ठाकरे तेव्हा कोकण दौरा करणार होते.
आम्ही ही सर्व माहिती सह पोलीस आयुक्त (गुन्हे) मीरा बोरवणकर यांना सांगितली. त्यांनी तत्कालीन आयुक्त ए.एन. रॉय यांना माहिती दिली. रॉय यांनी राज ठाकरेंना याबाबतची माहिती दिली. तसंच कोकण दौरा टाळण्याचा सल्ला दिला.
( नक्की वाचा : कल्याणमध्ये पोलीस ठाण्यातच 'राडा', मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाही मारहाण; वाचा काय आहे प्रकरण? )
बाळासाहेबांच्या हत्येचा कट उधळला
प्रदीप शर्मा यांनी या मुलाखतीमध्ये आणखी एका धक्कादायक घटनेचा उल्लेख केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ठार मारण्याचा कट कसा उधळला याची माहिती त्यांनी दिली. ते या मुलाखतीमध्ये म्हणाले, '2003 मध्ये मुलुंडमध्ये झालेल्या रेल्वे स्फोटातील वॉन्टेंड दहशतवाद्यांपैकी 2 पाकिस्तानी आणि 1 काश्मिरी होता. त्यांना पकडण्यासाठी आम्ही गेलो. ते अतिरेकी दुपारी 12 वाजता गोरेगाव महामार्गावरील महानंदा डेअरीजवळ येणार अशी माहिती आम्हाला मिळाली होती.
मातोश्रीवर हल्ला करुन बाळासाहेब ठाकरेंना मारण्याचा अतिरेक्यांचा प्लॅन होता. त्यांच्याकडं AK 56, AK 47 सह ग्रेनेड दारुगोळा होता अशी माहिती आम्हाला होती. आमच्याकडं वाहनाचा नंबर होता. त्यावेळी सत्यपाल सिंह सहआयुक्त तर आर.एस. शर्मा पोलीस आयुक्त होते. त्यांनी आपल्या लोकांना काही होणार नाही याची काळजी घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
इतकंच नाही तर अतिआत्मविश्वासात न जाता बुलेटप्रुफ जॅकेट घालून जाण्यास सांगितलं. मी आणि माझे सहकारी बुलेटप्रुफ जॅकेट घालून गेलो. माझ्या बुलेटप्रुफ जॅकेटला AK47 च्या दोन गोळ्या लागल्या. त्या तीन अतिरेक्यांचं दुपारी 12 वाजता आम्ही एन्काऊन्टर केलं. ते अतिरेकी मातोश्रीला जाणार होते. त्यावेळी छातीवर न लागता चेहऱ्यावर गोळी लागली असती तर माझा जीव वाचला नसता असं शर्मा म्हणाले.
त्यावेळी उद्धव ठाकरे ठाकरे यांनी मला मातोश्रीवर चहा प्यायला बोलावलं होतं आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट घालून दिली, असंही शर्मा यांनी सांगितलं.