Mumbai News: कोटक महिंद्राच्या 100 शेअर्ससाठी 31 वर्ष कोर्टात यशस्वी लढा! 39 हजार रुपयांचे झाले 19 लाख

विलेपार्ले येथील रहिवासी असलेल्या रमेश सनाठरा यांनी फेब्रुवारी 1994 मध्ये 'कांचनलाल अँड सन' या ब्रोकरमार्फत कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेडचे 100 शेअर्स 39,700 रुपयांना खरेदी केले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

तुमची बाजू सत्य असेल आणि पुरावे असतील, तर उशिरा का होईना न्याय नक्की मिळतो, याचे हे जिवंत उदाहरण समोर आले आहे. एका गुंतवणूकदाराने तब्बल तीन दशके कोर्टाच्या पायऱ्या झिजवून आपल्या हक्काचे शेअर्स अखेर मिळवले आहेत.

मुंबईत जन्मलेले आणि सध्या कॅनडामध्ये राहणारे गुंतवणूकदार रमेश एन. सनाठरा यांनी कोटक महिंद्रा शेअर प्रमाणपत्रांबाबतचा 31 वर्षांचा ऐतिहासिक कायदेशीर लढा जिंकला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश एस. पाटील यांनी या प्रकरणावर अंतिम निकाल दिला. उच्च न्यायालयाने कोटक महिंद्रा बँक आणि केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडला हे शेअर्स डिमॅट स्वरूपात रूपांतरित करून सर्व लाभांसह सनाठरा यांच्या नावावर करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement

नेमका काय होता हा 31 वर्षांचा वाद?

विलेपार्ले येथील रहिवासी असलेल्या रमेश सनाठरा यांनी फेब्रुवारी 1994 मध्ये 'कांचनलाल अँड सन' या ब्रोकरमार्फत कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेडचे 100 शेअर्स 39,700 रुपयांना खरेदी केले होते. हे शेअर्स त्यांच्या हातात पडण्यापूर्वीच स्टॉक एक्सचेंजच्या सेटलमेंट प्रक्रियेदरम्यान गहाळ झाले. सनाठरा यांनी याविरोधात पोलिसात तक्रार केली आणि कंपनीला 'स्टॉप-ट्रान्सफर'चे आदेशही दिले, पण तरीही हा वाद कोर्टात गेला.

(नक्की वाचा-  Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)

1995 मध्ये त्यांनी सिटी दिवाणी न्यायालयात पहिला खटला दाखल केला. या प्रदीर्घ प्रवासात पूर आल्यामुळे रेकॉर्ड नष्ट होणे, डुप्लिकेट शेअर्सचे दावे आणि कायदेशीर अडथळे यांमुळे हा खटला रेंगाळत गेला. एकवेळ अशी आली की केस बाजूला पडली होती, परंतु त्यांच्या वकिलांनी जुने रेकॉर्ड शोधून केस पुन्हा जिवंत केली.

100 शेअर्सचे 5000 शेअर्स कसे झाले?

सनाठरा यांचे वकील महेश विनोद राजपोपट आणि अक्षित देवेंद्र कोठारी यांनी कोर्टात बाजू मांडली. ॲड. राजपोपट यांनी सांगितले की, गेल्या 31 वर्षांत कंपनीने वेळोवेळी दिलेले बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट यामुळे मूळ 100 शेअर्सची संख्या सातत्याने वाढत गेली. आधी हे 100 शेअर्स वाढून प्रत्येकी 5 रुपये मूल्याचे 1000 शेअर्स झाले. त्यानंतर बँकेने प्रत्येक शेअरचे 5 लहान शेअर्समध्ये विभाजन केल्यामुळे आज त्यांचे एकूण 5000 शेअर्स झाले आहेत.

(नक्की वाचा-  Meta News: फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप युजर्सना मोजावे लागणार पैसे! मेटाने जाहीर केले प्लॅन)

उच्च न्यायालयाने गुंतवणूकदाराच्या बाजूने निकाल देताना आयईपीएफ मध्ये जमा झालेले कॉर्पोरेट लाभ मिळवण्यातही सनाठरा यांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत. हा निकाल देशातील खऱ्या आणि प्रामाणिक गुंतवणूकदारांच्या हक्कांचे रक्षण करणारा एक ऐतिहासिक दस्तावेज ठरला आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article