'हा किल्ला शिवकालीन...'; महाराजांच्या गोपाळगड किल्ल्यावर दावा करणाऱ्या मणियारांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?

अखेर गुहागरमधील गोपाळगड किल्ल्याच्या मालकीच्या दाव्यावरून निर्माण झालेल्या वादाला नवं वळण लागलं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Ratnagiri News : दोन आंबे उचलल्याच्या कारणावरून गुहागर तालुक्यातील ऐतिहासिक अंजरवेलच्या गोपाळगड किल्ल्यावर पर्यटकांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप समोर आला होता. गोपाळगड आमच्या मालकीचा असल्याचा दावा या गडावरील अय्याज मणियार यांनी केला होता. अखेर गुहागरमधील गोपाळगड किल्ल्याच्या मालकीच्या दाव्यावरून निर्माण झालेल्या वादाला नवं वळण लागलं आहे. 

अय्याज मणियार यांनी मागितली माफी...

अय्याज मणियार यांनी जाहीरपणे माफी मागत वाद शमवण्याचा प्रयत्न केला आहे. भावनिक अवस्थेत केलेलं वक्तव्य अयोग्य होतं असं म्हणत अय्याज मणियार याने माफी मागितली आहे. गोपाळगड हा शिवकालीन ऐतिहासिक वारसा असल्याची मणियार यांनी कबुली दिली आहे. दुखावलेल्या शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. अॅड. संकेत साळवी यांच्या उपस्थितीत त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यांच्या या माफीनाम्यानंतर वाद संपुष्टात येणार का, याकडे कोकणासह राज्याचं लक्ष आहे. 

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मणियार नावाची व्यक्ती गोपाळगड किल्ला स्वत:च्या मालकीचा असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. अखेर मणियार यांनी माफी मागितली असून गोपाळगडाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. 

नक्की वाचा - शिवरायांचा गोपाळगड किल्ला सरकारने 220 रुपयांना विकला होता? इम्तियाज मणियार कुटुंबाची मालकी अन् 2 आंब्यांचा वाद

गोपाळगडावर नेमकं काय घडलं? 

गोपाळगड हा राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेला ऐतिहासिक किल्ला आहे. यापूर्वी शासकीय त्रुटींमुळे किल्ल्याच्या मालकी हक्काबाबत वाद निर्माण झाला होता. मात्र न्यायालयीन लढ्यानंतर किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाला. असे असताना पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांशी कथित गैरवर्तन झाल्याचा आरोप समोर आल्याने हे प्रकरण पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. दोन आंबे उचलल्याच्या कारणावरून पर्यटकांना रोखून धरण्यात आल्याची चर्चा होत असून संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सागर पवार यांच्या कुटुंबाला गडाचे मालक म्हणून दावा करणारा मणियार याने रोखून ठेवलं होतं. हा किल्ला आपल्या मालकीचा असल्याचं मणियार याने म्हटलं आहे. शिवरायांचा किल्ला खासगी मालमत्ता कशी असू शकते असा सवाल दुर्गप्रेमींकडून केला जात आहे. 

या प्रकारानंतर दुर्गप्रेमी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्य संरक्षित स्मारकावर कोणाचाही खासगी मालकी हक्क असू शकत नाही. पर्यटकांना दमदाटी करणे अथवा डांबून ठेवण्याचा प्रयत्न करणे गंभीर बाब असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. संकेत साळवी यांनी केली आहे.