Buldhana News: शेतकरी आंदोलन पेटले! रविकांत तुपकरांच्या आंदोलनादरम्यान संतप्त आंदोलकांनी एसटी बस जाळली

Farmer Protest : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनादरम्यान शेतकरी आंदोलकांनी लोणार आगाराची मुक्कामी असलेली एसटी बस किनगाव जट्टू येथे पेटवून दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमोल सराफ, बुलडाणा

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी आणि विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन आता तीव्र केले आहे. 15 जूनपासून सुरू झालेल्या या आंदोलनात प्रशासनाकडून होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमधील संताप उफाळून आला आहे. या संतापातूनच 16 जूनच्या रात्रीच्या सुमारास किनगाव जट्टू येथे एका एसटी बसला आग लावण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

मुक्कामी असलेली लोणार आगाराची बस पेटवली

मिळालेल्या माहितीनुसार, लोणार आगाराची एसटी बस नेहमीप्रमाणे किनगाव जट्टू येथे रात्रीच्या मुक्कामासाठी गेली होती. याच दरम्यान रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आंदोलकांनी ही बस पेटवून दिली. सुदैवाने ही बस मुक्कामी उभी असल्याने आणि प्रवासी नसून मोठी जीवितहानी टळली असली, तरी बसचे यात प्रचंड नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Pune-Shirdi Railway: साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-शिर्डी पहिली थेट रेल्वे सेवा 17 जूनपासून सुरू)

ठिकठिकाणी जीआर आणि मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

प्रशासनाकडून आंदोलनाची दखल न घेतली गेल्याने दिवसभरात संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. शासनाने काढलेल्या फसव्या कर्जमाफीच्या सरकारी निर्णयाची ठिकठिकाणी होळी करण्यात आली. शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करून सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

(नक्की वाचा-  महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? ठाकरेंचे 6 खासदार 'नॉट रिचेबल', एकनाथ शिंदेंचं दिल्लीत 'ऑपरेशन टायगर'?)

आंदोलन आता शेतकऱ्यांच्या हातात

रविकांत तुपकर यांच्या प्रकृतीची चिंता आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे आता हे आंदोलन केवळ नेत्यांपुरते मर्यादित न राहता सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आपल्या हातात घेतल्याचे चित्र दिसत आहे. एका बाजूला अन्नत्याग आंदोलनामुळे तुपकरांची प्रकृती खालावत असताना, दुसरीकडे ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बस जळीत कांडानंतर पोलिसांनी किनगाव जट्टू आणि आसपासच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून, पुढील हिंसक घटना रोखण्यासाठी पावले उचलली जात आहेत.
 

Topics mentioned in this article