पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीमध्ये उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. डोंबिवलीतील ऐतिहासिक आणि मानाच्या श्री गणेश मंदिर संस्थानात दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामदैवताची महाआरती मोठ्या दणक्यात पार पडली. या सोहळ्यात भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ‘आशीर्वादाचा दिवा' प्रज्वलित करण्यात आला. या दिव्याच्या प्रज्वलनाने भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'सेवा संकल्प अभियाना'चा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.
विकसित भारताच्या संकल्पासाठी सामूहिक प्रार्थना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निरोगी, सुदृढ आणि दीर्घायुष्यासाठी तसेच 'विकसित भारत' घडवण्याच्या संकल्पासाठी असंख्य डोंबिवलीकरांनी ग्रामदैवत श्री वरदगणेशाच्या चरणी एकत्र येऊन सामूहिक प्रार्थना केली. "हा 'आशीर्वादाचा दिवा' म्हणजे मोदीजींच्या सेवाव्रताचा आणि विकसित भारताच्या दृढ संकल्पाचे प्रतीक आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरी किंवा परिसरात आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित करून पंतप्रधान मोदीजींना शुभाशीर्वाद द्यावेत," असे आवाहन रविंद्र चव्हाण यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, उपमहापौर राहुल दामले, गटनेते शशिकांत कांबळे, पश्चिम मंडळ अध्यक्षा प्रिया जोशी, नगरसेवक मंदार हळबे, नगरसेवक समीर चिटणीस, नगरसेविका ज्योती पाटील, मंदा पाटील, रंजना पेणकर, मृदुला नाख्ये, युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष अनमोल म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.