Ravindra Chavan : "सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करू नका"; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि भारताच्या जागतिक स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारताच्या जागतिक प्रतिमेवरून काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या एकत्रित छायाचित्राच्या आधारे भारताच्या जागतिक भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. या टीकेचा भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी दोन आंतरराष्ट्रीय छायाचित्रांचा दाखला देत खरपूस समाचार घेतला आहे.

दोन G20 छायाचित्रांच्या माध्यमातून रविंद्र चव्हाण यांचा पलटवार

रविंद्र चव्हाण यांनी २०११ मध्ये फ्रान्स येथे झालेल्या G20 परिषदेचे छायाचित्र शेअर केले, ज्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग मागील रांगेत उभे असल्याचे दिसते. तर त्यासोबत २०२४ मध्ये रिओ दि जानेरो येथे झालेल्या G20 परिषदेतील छायाचित्र जोडले. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रस्थानी उभे आहेत. या दोन्ही फोटोंना अनुक्रमे '२०१४ पूर्वीचा भारत' आणि '२०१४ नंतरचा भारत' अशी शीर्षके देत चव्हाण यांनी भारताच्या जागतिक प्रतिमेत झालेला बदल अधोरेखित केला आहे.

Advertisement

'दूध का दूध, पानी का पानी' 

राहुल गांधी यांच्या टीकेतील आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीतील विसंगतीवर बोट ठेवताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, "भूक सहन होईनाशी झाली की आपल्याला त्यापुढे काहीही दिसेनासं होतं. सत्तेच्या भुकेपुढे राहुलजींचीही हीच अवस्था झाली आहे." 

भारताच्या बदनामीविरोधात इशारा 

राजकीय सत्तासंघर्षापलीकडे देशाची जागतिक प्रतिष्ठा महत्त्वाची असल्याचे नमूद करत चव्हाण यांनी इशारा दिला की, "सत्तेच्या भुकेपोटी जर भारताची बदनामी करत सुटाल, तर याद राखा. कोणताही सच्चा भारतीय हे कधीही खपवून घेणार नाही."

जागतिक व्यासपीठावरील भारताच्या स्थानावरून राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना दोन कालखंडांतील छायाचित्रांची तुलना करत रविंद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राजकीय सत्तासंघर्षापलीकडे देशाची जागतिक प्रतिष्ठा महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर थेट प्रहार केला आहे.


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world