Pune Jain Boarding Land Dispute : पुण्यातील बहुचर्चित जैन बोर्डिंगच्या जमीन विक्री वादाने आता थेट नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरबारात धडक दिली आहे. शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. हा व्यवहार रद्द करावा आणि कठोर चौकशी व्हावी, या मागणीसाठी धंगेकर यांनी 27 ऑक्टोबर 2025 पासून पुणेकरांसह जैन बोर्डिंग येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही धंगेकर यांनी केली आहे.
काय म्हणाले धंगेकर?
रवींद्र धंगेकर यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करत ही माहिती सार्वजनिक केली. त्यांनी स्पष्ट केले की, "जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा व प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी, यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती करत आहे." यासोबतच, त्यांनी २७ ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली.
( नक्की वाचा : Pune News : पुण्यातील जैन बोर्डिंगचा तिढा वाढला! संतप्त समुदायाने मोहोळ यांना घेरले आणि थेट विचारले.... )
मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी
धंगेकर यांनी आपल्या पत्रात आणि ट्विटमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर थेट गंभीर आरोप केले आहेत. गेल्या 18 दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षात त्यांनी वारंवार पुरावे दिले आहेत की, या व्यवहारातील सर्व व्यक्ती आणि संस्था मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंधित आहेत. धंगेकर यांच्या मते, हा गैरव्यवहार मोहोळ यांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या प्रभावाखालीच घडला आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणे अत्यंत गरजेचे आहे, कारण ते पदावर असताना चौकशी प्रभावित होऊ शकते, असे धंगेकर यांचे म्हणणे आहे. समाजातील मंदिरे आणि देवस्थानच्या जागा हडप करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी मोहोळ यांचा राजीनामा घेऊन चौकशी करणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पंतप्रधानांसह अन्य नेत्यांनाही पत्राची प्रत
धंगेकर यांनी फक्त पंतप्रधानांनाच नव्हे, तर या पत्राच्या प्रती देशाचे गृह तथा सहकार मंत्री, तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही पाठवल्या आहेत. या सर्व प्रमुख नेत्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने आपल्या 'विशेष अधिकारातून' हा वादग्रस्त व्यवहार रद्द करावा आणि कठोर चौकशी होईपर्यंत मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा, अशी जोरदार मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.