Mumbai Rain Update : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात शुक्रवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज 16 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या कोकण किनारपट्टीच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने काही ठिकाणी 'अत्यंत जोरदार पाऊस' पडण्याची शक्यता वर्तवली आहे. ज्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई आणि परिसरातील हवामानाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि रायगडमध्ये 16 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी 'अतिमुसळधार पाऊस' आणि तुरळक ठिकाणी 'अत्यंत जोरदार पाऊस' पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी 'अतिमुसळधार पावसा'ची शक्यता आहे. दोन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
मुंबई महापालिकेचं आवाहन
भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. मुंबई महापालिका देखील या पार्श्वभूमीवर अलर्ट झाली आहे. नागरिकांनी आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.
हवामान विभागाचं नागरिकांना आवाहन
या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. घरातून निघण्यापूर्वी तुमच्या मार्गावर वाहतूक कोंडी आहे का, हे तपासा. कमकुवत इमारतींमध्ये किंवा जुन्या घरांमध्ये राहणे टाळा. विजा चमकत असताना खुल्या जागेत किंवा शेतात काम करणे टाळा. वीज चमकत असताना उंच झाडे किंवा खांबांखाली आसरा घेऊ नका. पाण्याच्या साठ्यातून बाहेर या आणि विद्युत वहन करणाऱ्या वस्तूंपासून दूर रहा.
पुढील दोन दिवस, म्हणजेच 17 आणि 18 ऑगस्ट रोजीही या भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. 17 ऑगस्ट रोजी मुंबई, रायगड आणि रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी 'अत्यंत जोरदार' पावसाचा अंदाज आहे. 18 ऑगस्ट रोजी रायगड आणि रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा 'अत्यंत जोरदार' पाऊस पडण्याची शक्यता आहे.