विशाल पाटील, मुंबई
Mumbai Thane Raigad rain Alert: मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट' जारी केला आहे. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वे सेवा उशिराने धावत आहे, ज्यामुळे सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले आहेत.
(नक्की वाचा- Pune Rain News: पुण्यात पुराचे टेन्शन, खडकवासलासह प्रमुख धरणांतून पाण्याचा विसर्ग)
मुंबई लोकलची वाहतूक उशीराने
मध्य रेल्वेची सेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे, तर हार्बर लाईनवरील गाड्याही 7 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला असून, या मार्गावरील गाड्या 5 मिनिटे उशिरा धावत आहेत.
(नक्की वाचा- Pune School Holiday: पुण्यात अनेक शाळांना सुट्टी जाहीर, मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचलं)
रायगडमध्येही पावसाचा कहर
रविवारी सायंकाळी दक्षिण रायगडला जोरदार पावसाने झोडपले. याचा सर्वाधिक फटका महाड आणि पोलादपूरला बसला. महाड शहरात पाणी साचले होते, तर महाबळेश्वर परिसरात झालेल्या पावसामुळे सावित्री नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. यामुळे पोलादपूरमधील नदीलगतच्या रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत पुराचे पाणी साचले होते, ज्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला होता. सुदैवाने पावसाचा जोर कमी झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे.