
Pune Rains Update: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या खडकवासला आणि वरसगाव धरणांतून आज (१५ सप्टेंबर) सकाळी पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुण्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या खडकवासला पाटबंधारे विभागाने यासंदर्भात 'सतर्कतेचा इशारा' जारी केला आहे. खडकवासला धरणातून ७६७७ क्युसेक्स तर वरसगाव धरणातून ३५७६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.
पुणे शहरातील मुठा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना आणि वस्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही नागरिकाने किंवा जनावरांनी नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीकाठच्या परिसरातील वाहने किंवा इतर साहित्य तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
(नक्की वाचा- Pune School Holiday: पुण्यात अनेक शाळांना सुट्टी जाहीर, मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचलं)
धरणांमधील पाण्याची सद्यस्थिती
जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमधील पाणीसाठा १०० टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे
- पानशेत धरण १०० टक्के भरले असून, यातून १७२० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
- वरसगाव धरण १०० टक्के भरले असून, यातून ३५७६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
- खडकवासला धरण ९८.४० टक्के भरले असून, यातून ७६७७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सकाळी ९ वाजता विसर्ग १०६११ क्यूसेक करण्यात येत आहे.
- टेमघर धरण १०० टक्के भरले असून, यातून पाण्याचा कोणताही विसर्ग सुरू नाही.
या धरणांमधील पाणीसाठ्याने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे, पुढील काही तासांत विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे. मुठा नदीपात्रामध्ये पाणी आल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना, जसे की पुणे महानगरपालिका (PMC), पुणे पोलीस, आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.
(नक्की वाचा- Maharashtra Rain Live Update : मुसळधार पावसामुळे लोकल सेवा विलंबाने)
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
या सतर्कतेच्या इशाऱ्यानुसार, मुळा-मुठा नदीपात्रातील धोकादायक भागात कुणीही जाऊ नये. पावसाचे प्रमाण पाहता नदीपात्रातील पाणीपातळी वाढू शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या परिस्थितीवर प्रशासन आणि जलसंपदा विभाग पूर्ण लक्ष ठेवून आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world